जामखेड : तालुक्यातील मोहरी येथील शेतकऱ्याचा मुलगा महेश गीते पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झाला. त्याच्या या यशाने गीते कुटुंबासह गावची व तालुक्याची मन उंचावली आहे.
मोहरी येथील बाबासाहेब व सोजरबाई गिते या दाम्पत्याच्या कुटुंबातील मनीषा, महेश आणि मंगेश अशी तीन भावंडे आहेत. यापैकी मनीषा सैनिक तुकाराम मिसाळ यांच्याशी विवाहबद्ध झालेली आहे. छोटा भाऊ मंगेश कला शाखेचा पदवीधर आहे. महेश ने बीएससी ऍग्री पर्यंतचे शिक्षण घेतले आणि वयाच्या 25 व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. महेश याला मिळालेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
महेश यांचे प्राथमिक शिक्षण मोहरी तालुका जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण आनंद विद्यालय (नगर) तर बीएससी ऍग्री पदवी एग्रीकल्चर कॉलेज ऑफ पुणे या ठिकाणी त्यांनी मिळवली. 2016 साली महेश बीएससी ऍग्री उत्तीर्ण होऊन पदवीधर झाला. 2017 साली महेशने पुण्यातच एम. एस्सी. ला प्रवेश घेतला. मात्र एम. एससी मध्ये महेश काही रमला नाही. त्याने ठरवलं की आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची. त्यासाठी अभ्यास करायचा. सलग तीन वर्ष सातत्याने पुणे येथे राहून अभ्यास केला. आणि महेश यशस्वी झाला. लहानपणी महेशने टीव्हीवर शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाल्याची बातमी ऐकली होती. तेंव्हाच ठरवलं होतं; आपणही कलेक्टर व्हायचं. आपणही शेतकऱ्याचा मुलगा आहोत, आपणही कलेक्टर होऊ शकतो, असा विश्वास महेशमध्ये निर्माण झाला.
महेशचे काका दादासाहेब गीते राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून तहसीलदार झाले. त्यांनी नगर जिल्ह्यात तहसीलदार म्हणून राहुरी येथे सेवा केली. सध्या ते सिंधुदुर्ग येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली महेशने केद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनीच खऱ्या अर्थाने महेशला प्रेरणा दिली आणि महेशने स्वतःचे पाहिलेले स्वप्न यानिमित्ताने पूर्ण केले.
महेश ता. 23 जुलैला दिल्लीवरून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती देऊन पुण्यात परतला होता. तेव्हापासून पुण्यात क्वारंटाईन होता. त्याचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. याच दरम्यान पुढच्या परीक्षेची तयारी त्याने सुरू केली होती. मात्र त्याला एका मित्राचा आज फोन आला आणि महेश अभिनंदन ! तू केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे त्याने सांगितले. खूप आनंद झाला.
महेशच्या आनंदाला पारावार उरला नाही. बीएससी ऍग्री झाल्यापासून महेश तीन वर्षे अभ्यास करीत होता. त्याला इतर कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळालं नव्हतं . मात्र थेट पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याचाही आनंद द्विगुणित झाला.
महेशने यश मिळाल्याचा पहिला फोन शेतकरी आई-वडीलांना आणि उपजिल्हाधिकारी काकांना केला. काका उपजिल्हाधिकारी असल्याने महेशला मिळालेले यश किती मोठे आहे, हे ते समजू शकले, मात्र शेतकरी असलेल्या आई वडिलांना मात्र महेश कोणीतरी मोठा माणूस झाला आहे, एवढेच समजले होतं. त्यांना त्याच्या यशाबद्दल काही अंदाज नव्हता, असे महेशने सांगितले.
मिळालेल्या यशाबद्दल बोलताना महेश म्हणाला," ग्रामीण भागातील मुलांनी न घाबरता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाची तयारी केली पाहिजे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तर यश निश्चित मिळतं. मी सलग तीन वर्षे सातत्याने, प्रामाणिकपणे अभ्यास केला. मला पहिल्याच प्रयत्नात आय.ए.एस. होण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी स्वतःला कमी न समजता कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर यशाची निश्चित मििळते, असे तो सांगतो.
Edited By - Murlidhar Karale

