महाविकास आघाडी सरकार हेच महाराष्ट्रावर मोठे संकट - The Mahavikas Aghadi government is the biggest crisis in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडी सरकार हेच महाराष्ट्रावर मोठे संकट

मुरलीधर कराळे
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे.

नगर : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पुर्ण झाले, परंतु कोणतेच ठोस कामे झाले नाहीत. उलट अनेक संकटे राज्यावर आली आहेत. महाविकास आघाडी सरकार म्हणजेच महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबाबत समाजातील प्रश्न व सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, की सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. हे सरकार लवकरच कोसळेल. कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील सरकार ओढून-ताणून झालेले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने एकमेकांत समन्वय नाही. त्यामुळे ते लवकरच कोसळणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. कोरोनाची, अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत आला. सध्या पाणी आहे तर वीज नाही, डीपी जळत आहेत, कुठलाही दूर दृष्टिकोन नसलेले सरकार आहे. त्यामुळे राज्यात कोणीच समाधानी नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. सध्याही केंद्राकडून राज्याला मोठा निधी देण्यात येत आहे, परंतु त्यांना घेता येत नाही, ही शोकांतिका आहे. कोविडच्या काळात केंद्राने चांगला निधी दिला, मात्र राज्य सरकारने काय दिले, असा प्रश्न प्रा. शिंदे यांनी केला.

कर्जत-जामखेडमध्ये विकासाच्या गप्पाच

कर्जत-जामखेडमध्ये केवळ विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून विशेष निधी मिळू शकला नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात लोकप्रतिनिधींनी विशेष कामे केली नाहीत. या उलट भाजपच्या काळात मोठा निधी या मतदारसंघात आणता आला. त्यामुळे आगामी काळातही विविध निवडणुकांमध्ये भाजपला जनता साथ देणार, यात शंका नाही. आगामी होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप बाजी मारेल. विरोधकांवर आता लोक विश्वास ठेवणार नाहीत. भाजपशिवाय आगामी काळात पर्याय नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख