महाजन, फडणवीस थकले, आता कृषीमंत्री चाैधरी हजारे यांना भेटणार - Mahajan, Fadnavis tired, will now meet Agriculture Minister Chaidhary Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

महाजन, फडणवीस थकले, आता कृषीमंत्री चाैधरी हजारे यांना भेटणार

एकनाथ भालेकर
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उद्या (शनिवारी) येथे उपोषण सुरू होणार आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व भाजपच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उद्या (शनिवारी) येथे उपोषण सुरू होणार आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व भाजपच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारचा लेखी मसुदा घेऊन आज दुपारी तीन वाजता राळेगणसिद्धीला हजारे यांच्या भेटीला येणार आहेत. समाधानकारक तोडगा निघतो किंवा न निघाल्यास हजारे उपोषणावर ठाम राहतात का, याकडे देशाचे व राळेगणसिद्धी परिवाराचे लक्ष लागले आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषीमुल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी हजारे उद्या शनिवारी (ता. ३०) जानेवारीपासून येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला आंदोलन सुरू करणार आहेत. 

अण्णांच्या मागण्या या शेतकरी हिताच्या आहेत. अण्णांनी या वयात उपोषणाऐवजी मौन वा धरणे आंदोलन करावे, अशी विनंती राळेगणसिद्धी परिवार व पोपटराव पवार यांनी केली आहे.

सन २०१८ व सन २०१९ च्या आंदोलनातील लेखी आश्वासनांची पुर्तता केंद्र सरकारने अद्याप केली नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे. हजारे उपोषणावर ठाम असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आदींनी चार ते पाच वेळा राळेगणसिद्धीला येऊन हजारे यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले.

वय पाहता अण्णांनी उपोषण करू नये, यासाठी भाजप नेत्यांनी गेल्या एक महिन्यांपासून राळेगणसिद्धीला वाऱ्या सरू केल्या होत्या. परंतु, दोन वेळा केंद्राने दिलेले लेखी आश्वासन पाळले नसल्याने आता चर्चा नको ठोस कार्यवाही करा, असे सांगत हजारे हे उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

दरम्यान, हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी उच्चाधिकार समिती नेमण्याची मागणी केली होती. त्याबाबत गुरूवारी (ता. 27) दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माजी मंत्री महाजन यांनी हजारे यांची भेट घेऊन काल सांगितले होते.

या समितीत केंद्र सरकारचे तीन तर हजारे सुचवतील, ते तीन सदस्य राहणार आहेत. तसेच माजी कृषीमंत्री सोमपाल शास्त्री व हजारे हे निमंत्रित सल्लागार सदस्य म्हणून राहणार आहेत, असे समजते.

मागील दोन आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याने फसवणूक झाल्याचा आरोप हजारे यांनी केला होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नी समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय हजारे उपोषणाच्या निर्णयापासून परावृत्त होणार नाहीत अशी परिस्थिती आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख