श्रीगोंदे : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी त्यांच्या पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. मगर यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे कारभारात मनमानी करीत असून, कारखान्यात साखर विक्री, मळी विक्रीत त्यांनी मोठा घोटाळा घातल्याचा गंभीर आरोप केला.
याबाबत मगर यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत कारखान्याचे संचालक अण्णा शेलार, पंचायत समितीचे सदस्य जिजाबापू शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दीपक भोसले, अॅड. बाळासाहेब काकडे, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते, हे हजर होते.
मगर म्हणाले, की ज्या त्यागातून दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याची उभारणी केली, त्याला तिलांजली देण्याचे काम सध्या विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे करीत आहेत. कारखान्यात साखर विक्री, मळी विक्री यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. बापुंनी ज्या आस्थेने कारखान्याचा कारभार केला त्यातून त्यांनी सभासदांचे हित पाहिले. सध्या सुरू असलेला कारभार हा शिवाजीराव बापूंच्या विचाराचा नसून चुकीच्या मार्गाने होत असल्याचे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. साखर व मळी विक्रीसोबतच सहवीज निर्मिती प्रकल्पात राजेंद्र नागवडे यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. गेल्या हंगामात कारखाना बंद ठेवून कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले.
कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत काय भूमिका राहील, असे विचारले असता मगर म्हणाले, की मी व मला माझ्या विचाराचे नेते कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासोबत राहणार नसून या निवडणुकीबाबत भूमिका लवकरच जाहीर करणार आहे. त्यासाठी सभासदांची भुमिका महत्वाची असून, बापू निष्ठावंतांचा मेळावा घेवून एकत्रीत निर्णय करु.
या वेळी अण्णा शेलार म्हणाले, की कारखान्याच्या अधिपत्याखालील शिक्षण संस्थेत मोठा गोंधळ सुरु आहे. शिक्षण भरतीत अध्यक्ष लाखो रुपये घेतात. त्याच्या मालकीच्या परभणी येथील खासगी कारखान्याला नागवडे कारखान्याचे साहित्य व अधिकारी पुरविले जात असल्याने आगामी काळात हा कारखाना वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आरोप बिनबुडाचे : नागवडे
कारखान्याचा कारभार हा बापुंच्याच विचाराने सुरु आहे. निवडणूक आली आहे, त्यामुळे असले बिनबुडाचे आरोप होतील, मात्र सभासद सुज्ञ आहेत. त्यांना माहिती आहे बापुंचे मुले चुकणार नाहीत. त्यामुळे असल्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन आम्ही सगळे संचालक एका विचाराने भविष्यात कारखाना योग्य पध्दतीने चालविणार आहोत, असे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.
Edited by - Murlidhar Karale

