अकोले : ``मी चाळीस वर्षात जे केले, ते तालुक्याच्या विकासासाठी केले. आज तालुक्यात पाटपाण्याचा प्रश्न असेल, शेतीविकासाचा असेल, रस्ते, शिक्षण, दळणवळण, वीज यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आणून १२ लघू, १ माध्यम व १ निळवंडे सारखा प्रकल्प उभारला. त्यांनी काय केले, ते सांगावे. माझे आव्हान आहे, तुम्हाला मी जागा दाखवतो, एक तरी धरण बांधून दाखवा, मग बिनबुडाचे आरोप करा,`` असा टोला माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्यावर केला.
पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत घेतलेल्या धाडशी निर्णयाचे स्वागत त्यांनी केले. चाळीस वर्षात काय केले,` असा सवाल विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देताना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिले.
पिंपळगाव खांड सारखे अनेक धरणे बांधून तालुका सुजलाम सुफलाम करून आज शेतकरी त्याच्या पायावर भक्कम उभा आहे. मात्र विरोधकांनी काय केले, त्याचे एक उदाहरण दाखवा. तालुक्यात आजही १० जागा पाणी अडविण्यासाठी असून, मी जागा दाखवतो, विरोधकांनी एखादे धरण किंवा बंधारा बांधून दाखवावा, असा टोला पिचड यांनी लगावला.
पिचड म्हणाले, की मी तालुक्यात १३ लघू व माध्यम २ अशी १५ जलाशयाची साखळी उभी केली. त्यामुळे शेतीला पाणी, पिण्यासाठी पाणी, उपसासिंचन योजना काही खाजगी, सामुदायिक त्यासाठी राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता केली. त्यामुळे शेती शिवार हिरवे झाले. शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात आमूलाग्र बदल झाला, हा बदल कसा झाला, हे विरोधकांनी पाहावे. म्हणे ४० वर्षात काय केले. विरोधकांना माझे आव्हान आहे, तुम्ही एक तरी बांधून दाखवा. मी जागा दाखवतो. तालुक्यात खेतेवाडी, फोफसंडी, केली (खरचुंडी), केळी, वागदरी तळे, अप्पर आंबित, मेहदुरी (घोगस), मान्हेरे (माकडडोह), एकंदर (पिंपळदरा वाडी) अशी दहा ठिकाणे आहेत. त्यातील एक तरी मंजूर करून मार्गी लावा, नाही जमले तर मला सांगा, मात्र खोटे आरोप बिनबुडाचे करू नका, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

