पैशाचा हव्व्यास ! पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले - The lust for money! Police caught the sub-inspector taking a bribe | Politics Marathi News - Sarkarnama

पैशाचा हव्व्यास ! पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले

वसंत सानप
बुधवार, 6 जानेवारी 2021

भावासाठी नाना तनपुरेंचे प्रयत्न चालूच होते, पोलिसांनी नाना तनपुरेला पोलीस ठाण्याला बोलावून एक लाखाची मागणी केली, मात्र तीस हजार रुपयांत सेटलमेंट झाले व कोठे द्यायचे ठरले.

जामखेड : भावावर दाखल झालेल्या गुन्ह्यातुन सुटका व्हावी, म्हणून आठ हजार रुपयांमध्ये देवाणघेवाण झाली, पण रक्कम कमी असल्याने पोलिसांकडून जास्त रक्कमेची मागणी झाली. तीस हजार रूपयांमध्ये मिटले, पण जास्त पैसे जातात म्हणून फिर्यादीने नगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व आज सापळा रचून जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांना पकडण्यात आले.

जामखेड पोलिस ठाण्यात पोक्सो गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाची चारचाकी गाडी वापरली, त्या गाडीचा चालक शहाजी तनपुरे (शिऊर) वर गुन्हा दाखल झाला होता. चालकाचा भाऊ नाना तनपुरे यांनी भावाला वाचविण्यासाठी पोलिसांकडे गेला व 28 डिसेंबर रोजी आठ हजार रुपये रोख दिले, मात्र दुसऱ्या दिवशी एवढ्या कमी रकमेत मिटत नाही, म्हणत पोलिसांनी परत दिले. पुन्हा 31 डिसेंबर रोजी त्या चालकाला अटक करून 1 जानेवारीला श्रीगोंदे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

भावासाठी नाना तनपुरेंचे प्रयत्न चालूच होते, पोलिसांनी नाना तनपुरेला पोलिस ठाण्याला बोलावून एक लाखाची मागणी केली, मात्र तीस हजार रुपयांत सेटलमेंट झाले व कोठे द्यायचे ठरले. वैतागून नाना तनपुरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगरकडे तक्रार अर्ज केला.  5 जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामखेड येऊन रितसर तक्रार दाखल करून घेतली व सापळा रचून जामखेड नगर रोडवरील एका हाॅटेलचालकाच्या मध्यस्थीने पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांना पकडले.

जामखेड पोलीस ठाण्याला लाचलुचपत प्रतिबंधात्मक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे कॉन्स्टेबल तनवीर शेख प्रशांत जाधव वैभव पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

दरम्यान, जामखेडमध्ये असे प्रकार अधिकाऱ्यांकडूनच होत असल्याने त्याची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख