जिल्हा बॅंकेत पारनेरला लॉटरी ! मिळाले शेळके, गायकवाड हे दोन संचालक - Lottery for Parner at District Bank! Shelke and Gaikwad are the two directors | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेत पारनेरला लॉटरी ! मिळाले शेळके, गायकवाड हे दोन संचालक

मार्तंड बुचुडे
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सुरवातीपासून शेळके यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. त्यांची निवडच बिनविरोध होईल, असे वाटत होते. मात्र, शिवसेनेचे भोसले यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही.

पारनेर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उदय शेळके यांनी सेवा संस्था मतदारसंघातून विजय मिळवित हॅट्रिक केली. त्यांना 105 पैकी 99 मते मिळाल्याने शिवसेनेचे विरोधी उमेदवार रामदास भोसले यांचा दारुण पराभव झाला. बिगशेती मतदारसंघातूनही बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रेय पानसरे यांचा 189 मतांनी पराभव केला. या दोघांच्या विजयामुळे तालुक्‍याला दोन संचालक मिळाले असून, यानिमित्ताने जिल्हा बॅंकेत लॉटरी लागली आहे. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सुरवातीपासून शेळके यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. त्यांची निवडच बिनविरोध होईल, असे वाटत होते. मात्र, शिवसेनेचे भोसले यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. सुरवातीस आमदार नीलेश लंके यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, लंके यांनी माघार घेतल्याने शेळके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. शेळके यांच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही आग्रही होते. 

हेही वाचा... जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय एकत्रित घेणार ः थोरात

शिवसेनेचे भोसले यांच्या उमेदवारीला भाजपने पाठिंबा दिला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यासाठी मेळावा घेतल्याने भोसले या निवडणुकीत जाण आणतील, असा कयास होता. मात्र, प्रत्यक्ष तसे घडले नाही. शिवसेनेची मतेही त्यांना मिळाली नसल्याचेच दिसते. 

हेही वाचा.. शिवाजी कर्डिले यांचा दणदणीत विजय

लंके यांच्या उपस्थितीत शेळके यांनी मांडओहोळ येथे मतदारांचा मेळावा घेतला, त्याच वेळी 105 पैकी 96 मतदार उपस्थित होते. त्यामुळे त्याच वेळी त्यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. गतवेळी बिनविरोध निवडून आलेल्या शेळके यांनी यंदा मोठ्या मताधिक्‍यांनी विजयी होत हॅट्रिक केली. शिवसेनेची मते फोडण्यात लंके व शेळके यशस्वी झाले. 

गायकवाड यांचा एकतर्फी विजय 

बिगरशेती मतदारसंघातून बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनीही दत्तात्रेय पानसरे यांचा 189 मतांनी पराभव केला. त्यांना 1341 पैकी 574, तर गायकवाड यांना 763 मते मिळाली. शेळके व गायकवाड यांच्या विजयामुळे पारनेरला जिल्हा बॅंकेत लॉटरी लागली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख