लोखंडे यांनी स्विकारले वाकचौरे यांचे आदिरतिथ्य ! चुकलेल्या निर्णयाबाबत आठवणींना उजाळा - Lokhande accepts Wakchaure's hospitality over wrong decision! | Politics Marathi News - Sarkarnama

लोखंडे यांनी स्विकारले वाकचौरे यांचे आदिरतिथ्य ! चुकलेल्या निर्णयाबाबत आठवणींना उजाळा

सतीश वैजापूरकर
सोमवार, 11 जानेवारी 2021

खासदार लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पोह्यांचा आस्वाद घेत चहापान घेतले. तासभराच्या या भेटीत दोघांनीही मोकळेपणाने चर्चा केली.

शिर्डी : निर्णय चुकला की राजकारणात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. तरीही निर्णय घ्यावेच लागतात. या मुद्यावर परस्पर सहमती व्यक्त करीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आदरातिथ्य स्विकारले. दोघांनीही पोह्यांचा आस्वाद घेत भुतकाळातील कटू आठवणी विसरून जायचे ठरविले. चुकलेल्या राजकीय निर्णयांवर मोकळेपणाने चर्चा केली. शहरातील हॉटेल व्यावसाईक दिलीप वाकचौरे यांच्या पुढाकारातून ही सदिच्छा भेट झाली. 

खासदार लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पोह्यांचा आस्वाद घेत चहापान घेतले. तासभराच्या या भेटीत दोघांनीही मोकळेपणाने चर्चा केली. 

मोदी लाटेवर स्वार होत होत खासदार सदाशिव लोखंडे येथून सलग दोन वेळा लोकसभेत गेले. लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी चालून आलेली असताना माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ती हातची घालविली. शिवसेनेचे खासदार असताना पुन्हा त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. ही उमेदवारी नाकारून त्यांनी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी स्विकारली. मोदी लाटेत पराभव वाट्याला आला. दुसऱ्यावेळी पुन्हा मोदी लाट आली तिच्यावर स्वार होत खासदार लोखंडे दुसऱ्यांदा लोकसभेत गेले. तर वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लागोपाठ दोन्ही निर्णय चुकले. 

खासदार लोखंडे यांनी देखील या भेटीत त्यांच्या चुकलेल्या निर्णयावर भाष्य केले. तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठनेते हशु अडवाणी यांच्या तालमीत तयार झालेल्या लोखंडे यांना 2009 साली मुंबईतील चेंबूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची होती. तत्कालीन खासदार राम नाईक यांच्याकडे तिकीटवाटपाचे अधिकार होते. पहिल्या दोन यादित लोखंडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे संतापलेल्या लोखंडे यांनी तिसऱ्या यादित नाव येऊन देखील उमेदवारी नाकारली. शेजारच्या कुर्ला मतदार संघातून मनसेच्या तिकीटीवर उमेदवारी लढविली आणि अवघ्या तिन हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. केवळ चुकीच्या निर्णयामुळे आमदारकीची हातातोडांशी संधी त्यावेळी हुकली. त्यानंतर ते पुन्हा भाजपात आले. त्यापूर्वी ते भाजपच्या तिकीटावर कर्जत जामखेड मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार झाले. 2009 साली चुकलेला निर्णय मात्र त्यांनी कायमचा लक्षात ठेवला. 

तशी माजी खासदार वाकचौरे यांनाही साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते खासदार अशी फार मोठी संधी मिळाली. अर्थात चुकीच्या निर्णयामुळे ती नंतर हुकली. तेही पुन्हा भाजपत आले. दोन पराभवानंतर न खचता पुन्हा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपची उमेदवारी केली. थोड्या मतांनी पुन्हा संधी हुकली. या दोघां आजीमाजी खासदारांना चुकीच्या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागली. या भेटीत दोघांनीही त्यावर चर्चा केली. भुतकाळात घेतलेले निर्णय चुकीचे होते. "गुजरा हुआ जमाना आता नहि दुबारा' हे वास्तव स्विकारीत दोघांनीही कटुता विसरण्याचा निश्‍चय करीत ही सदिच्छा भेट आटोपती घेतली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख