नगर : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शहरात लाॅक डाऊन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. परंतु प्रशासन तशी परवानगी देत नव्हते. काल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाच्या वतीने लाॅकडाऊनला नकार दिला असला, तरी स्थानिक पातळीवर नेत्यांनी निर्णय घेण्याची मोकळीक दिली आहे. साहजिकच हा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांना घ्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारने देशात कुठेही लाॅकडाऊन केले जाणार नाही, असे घोषित केले आहे. त्यामुळे भाजपचा लाॅकडाऊनला जाहीर पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. साहजिकच शहरातील भाजप नेते जाहीरपणे बोलणार नाहीत. परंतु शहरात मृत्यूचे तांडव सुरू असल्याने विरोधही करणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातून लाॅकडाऊनची मागणी होत आहे. व्यापारी, दुकानदार आदींचाही लाॅकडाऊनला जाहीर विरोध नाही. त्यामुळे लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्यास त्याला नगरकरांचा लगेचच पाठिंबा मिळेल, असे अनेकांचे मत आहे.
प्रशासन राहणार अलिप्त
मागील वेळी लाॅकडाऊन झाला, त्या वेळी प्रशासनाने कडक बंदोबस्त केला होता. या वेळी मात्र प्रशासन त्यात विशेष लक्ष घालणार नाही. म्हणजेच नागरिकांना स्वयंस्फूर्तीने त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. पुर्वीप्रमाणे चाैका-चाैकात पोलिस दिसणार नाहीत, की जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कोणावर कारवाईसाठी पुढे येणार नाही. मात्र नेत्यांच्या आवाहनानुसार लोकांच्याच पुढाकारातून अशा पद्धतीने लाॅकडाऊन होऊ शकेल. यापूर्वी राहुरी, श्रीरामपूर येथील अनुभव त्यासाठी कामे येणार आहे. प्रशासनाच्या वतीने हे लाॅकडाऊन नसेल, मात्र प्रशासन वेळेनुसार सहकार्यही करणार आहे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी सांगितली आहे.
व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर मदार
लाॅकडाऊनसाठी व्यापारी कशी भूमिका घेतात, यावर नेत्यांची मदार असणार आहे. कारण व्यापाऱ्यांना काही विरोधक नेत्यांनी पुढे घातले, तर लाॅकडाऊन हाणूनही पाडला जाऊ शकतो. परंतु नगर शहरातील काही मोठे व्यापारी कोरोनाचे बळी ठरलेले आहेत. अनेक दुकानदारांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे व्यापारी या लाॅकडाऊनला विरोध करतील, असे वाटत नाही. साहजिकच या निर्णयाची व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर मदार असणार आहे.

