पुन्हा लॉकडाउन! कोविड रुग्ण वाढल्याने पिंपळवाडी तीन दिवस बंद  - Lockdown again! Pimpalwadi closed for three days due to increase in covid patients | Politics Marathi News - Sarkarnama

पुन्हा लॉकडाउन! कोविड रुग्ण वाढल्याने पिंपळवाडी तीन दिवस बंद 

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 28 जानेवारी 2021

गेल्या 10 दिवसांत येथे तातडीने रॅपिड अँटिजेन चाचण्या करून संसर्ग नियंत्रित ठेवणे गरजेचे होते. मात्र, सध्या तालुक्‍यात किट शिल्लक नाहीत. अंगणवाडी सेविकांद्वारे घरोघरी जाऊन थंडी-तापाचे रुग्ण शोधण्याचे काम सुरू आहे.

शिर्डी : सरकारी आरोग्ययंत्रणा कोविड लसीकरणात मग्न असताना, शहरालगतच्या पिंपळवाडी येथे कोविडने उच्छाद मांडला. चार हजार लोकसंख्येच्या या गावात गेल्या 10 दिवसांत बाधितांची संख्या 16हून अधिक झाली. त्यात एकाचा बळी गेला. त्यामुळे काल (बुधवारी) मध्यरात्रीपासून गावात तीन दिवस लॉकडाउन करण्यात आले आहे. येथील रहिवाशांचा शिर्डीशी नित्याचा संपर्क असतो. 

गेल्या 10 दिवसांत येथे तातडीने रॅपिड अँटिजेन चाचण्या करून संसर्ग नियंत्रित ठेवणे गरजेचे होते. मात्र, सध्या तालुक्‍यात किट शिल्लक नाहीत. अंगणवाडी सेविकांद्वारे घरोघरी जाऊन थंडी-तापाचे रुग्ण शोधण्याचे काम सुरू आहे. सरकारी यंत्रणेने येथील परिस्थिती फारशी गांभीर्याने घेतली नाही. रुग्णसंख्या वाढू लागल्याने अखेर बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन करण्याची वेळ आली. 

तालुक्‍यातून कोविडने जवळपास गाशा गुंडाळला होता. साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात अवघ्या चार रुग्णांवर उपचार सुरू होते. सरकारी आरोग्ययंत्रणा काहीशी सुस्तावलेली असताना, पिंपळवाडीत अचानक बाधितांची संख्या वाढू लागली. सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. गागरे यांच्या माहितीनुसार 14 रुग्ण आहेत. नाशिक येथील खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. 13 पैकी 10 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन परतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांच्याकडे, येथे 16 रुग्ण असल्याची माहिती आहे. थंडी-तापाचे रुग्ण शोधणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या माहितीनुसार रुग्णसंख्या 22वर पोचली आहे. 

माजी सरपंच वाल्मीक तुरकणे म्हणाले, ""कोविड संसर्ग रोखण्यासाठी तातडीने अँटिजेन चाचण्या करणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेने बाधितांच्या संपर्कात आलेल्या अडीचशेहून अधिक रुग्णांना थंडी-ताप आला का, याची तपासणी अंगणवाडी सेविकांद्वारे केली. मात्र, त्यामुळे संसर्ग रोखला जाणार नाही. रॅपिड व गरज असेल तेथे आरटीपीसीआर चाचणी करून संसर्ग रोखण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली करणे गरजेचे आहे. 

सत्ता पाहता आली नाही.. 

पिंपळवाडी ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली. घरोघरी जाऊन प्रचार, वाड्या-वस्त्यांवरील सभा व बैठकांमुळे संसर्ग फैलावला. निवडणुकीत "गणेश'चे माजी संचालक उमाकांत तुरकणे यांचे मंडळ विजयी झाले. मात्र, दुर्दैवाने कोविड संसर्गात हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले. सत्ताधारी मंडळ त्यांना 6 जागा बिनविरोध द्यायला तयार होते. निवडणूक निकालानंतर त्यांच्या मंडळाला खरोखर तेवढ्याच जागा मिळाल्या. सत्ता ताब्यात आली; मात्र हा विजय पाहायला ते आता हयात नाहीत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख