जनावरांच्या साक्षीने गोठ्यात लिहिले पत्र ! धाडले टपालाद्वारे मुख्यमंत्र्यांना - Letter written by an animal witness in the barn! To the Chief Minister by post | Politics Marathi News - Sarkarnama

जनावरांच्या साक्षीने गोठ्यात लिहिले पत्र ! धाडले टपालाद्वारे मुख्यमंत्र्यांना

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी हे आनोखे आंदोलन उभारून मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील 5 हजार पत्र पाठविण्याचे नियोजन केले आहे.

नगर : दुधाला दरवाढ मिळण्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोनामागे आंदोलने केली, परंतु त्याला यश आले नाही. त्यामध्ये भाजपने उडी घेत शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली. दूध दरवाढीसाठीचे हे आंदोलन राज्यभर सुरूच आहे. प्रारंभी दूध रस्त्यात ओतले, नंतर दगडाला दुग्धाभिषेक केला. आता थेट जनावरांच्या गोठ्यात शेतकऱ्यांकडून पत्र लिहून घेऊन ते टपाल पेटीत टाकून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आंदोलन सुरू झाले आहे.

नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी हे आनोखे आंदोलन उभारून मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील 5 हजार पत्र पाठविण्याचे नियोजन केले आहे.

दुधाचे भाव कोसळल्यामुळे दूध उत्पादन शेतकरी संकटात सापडला आहे. दूध दर वाढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवला जात आहे. याचाच भाग म्हणून भाजपा नगर तालुक्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांना तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांची पत्रे पाठविणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिली.

या वेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, सरपंच विजय शेवाळे, बाबासाहेब शेवाळे, किरण धावणे, तालुका सरचिटणीस बाप्पू बेरड, भाऊसाहेब काळे, उपाध्यक्ष उमेश डोंगरे, राजेंद्र दारकुंडे, गोवर्धन शेवाळे, सागर भोपे आदी उपस्थित होते.

हे मलई सरकार : प्रा. बेरड

राज्य सरकार निष्क्रिय असून, भाजप सरकारच्या काळात दुधाला ३५ रुपये भाव मिळत होता, या सरकारला शेतकऱ्यांचे घेणेदेणे नाही. हे सरकार फक्त मलई घेण्यात व्यस्त असल्याची टीका या वेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी केली.

झोपलेले सरकार जागे व्हावे ः कोकाटे

या वेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, झोपलेले सरकार जागे व्हावे आणि सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न समजावे व शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या गोठयांमध्ये जाऊन शेतकऱ्यांकडून पत्रे लिहून घेत आहोत. सदर पत्रे वाचून तरी लवकरच सरकारला जाग येवो आणि सरकार दूध दरवाढीची मागणी मान्य करो, अशी अपेक्षा या वेळी कोकाटे यांनी व्यक्त केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख