नगर : ``जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर तेथे इतर आजारांवरही शस्त्रक्रिया व उपचार अन्यत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे रुग्णांची हेळसांड लक्षात घेवून नगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनीधींना घेऊन पाठपुरावा केला जाईल,`` असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी या वेळी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, की जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्या आणि स्वताबरोबरच इतरांचे आरोग्याला धोका पोचविणार्यावर कडक कार्यवाही करा.
सध्या आपल्याकडे कोरोना वाधित ७४९ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. लक्षणे आढळल्यास वेळेत उपचारासाठी दाखल झाल्यास रुग्ण हमखास बरा होऊ शकतो. याशिवाय, मृत्यूही टाळता येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज सुमारे 250 टेस्ट
साधारणता जुलै आणि ऑगस्टअखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सीजन सिलींडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून, पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नाही. जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डिस्ट्रीक्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांच्या वर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅबमध्ये आता साधारणता दरदिवशी २२५ ते २५० इतक्या चाचण्या केल्या जात आहेत. हे प्रमाण दरदिवशी ३७५ ते ४०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय, अॅण्टीजेन कीटच्या माध्यमातून येत्या एक दोन दिवसांत चाचण्यांना सुरुवात होणार आहे. हे कीट जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी रुग्णवाहिकांवरील चालक कामावर येत नसल्याचे आढळले आहे. अशा संकटाच्या वेळी कामात कुचराई करणार्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

