मंत्री गडाख यांच्या वस्तीवर बिबट्या ! तातडीने लावला पिंजरा - Leopards on Minister Gadakh's residence! Immediately planted cage | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

मंत्री गडाख यांच्या वस्तीवर बिबट्या ! तातडीने लावला पिंजरा

विनायक दरंदले
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

मंत्री गडाख यांच्या राहत्या घराच्या मागील रस्त्याने युवा नेते उदयन गडाख व नितीन काळे शनिवारी रात्री घराकडे जात असताना शेजारच्या ऊसातून आवाज आल्याने त्यांनी आपली मोटार थांबवली.

सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील वस्तीजवळ सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परीसरात धाकधूक वाढली आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन होताच तातडीने त्या परिसरात वनविभागाने पिंजरा लावला आहे.

मंत्री गडाख यांच्या राहत्या घराच्या मागील रस्त्याने युवा नेते उदयन गडाख व नितीन काळे शनिवारी रात्री घराकडे जात असताना शेजारच्या ऊसातून आवाज आल्याने त्यांनी आपली मोटार थांबवली. घराच्या डाव्याबाजूने बिबट्या उजव्या बाजूच्या शेतात जाताना गडाख व काळे यांनी पाहिला. त्यांनी पळालेला बिबट्या आपल्या मोबाईल मध्ये अचूक टिपला आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री गडाख यांच्या घराच्या जवळच बिबट्या दिसला होता.

सलग दोन दिवस बिबट्या दिसल्यानंतर वन विभागास माहिती देण्यात आली. आज मंत्री गडाख यांच्या राहत्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला आहे. नऊ महिन्यापूर्वी याच वस्तीजवळ वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. सलग दोन दिवस बिबट्या दिसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.

दरम्यान, पाथर्डी तालुक्यातून मागील पंधरा दिवसांत दोन बिबटे बकडण्यात वनविभागाला यश आले. पाथर्डीत बिबट्याने तीन बालकांचा जीव घेतला. आईच्या समोरून एका बाळाला उचलून नेऊन ठार केले. हा नरभक्षक बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यात कैद केला असला, तरी नेवासे, पाथर्डी, नगर तालुका, आदी भागात सध्या बिबट्याचे दर्शन जास्त होऊ लागले आहे. अकोले तालुका तर बिबट्याचे माहेरघर बनले आहे. नगर तालुक्यातील डोंगराळ भागात बिबट्याला लपण्यास मोठी जागा आहे. त्यामुळे या परिसरात रानडुकरे व बिबटे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी आहे. तथापि, बिबट्याचा बंदोबस्त करणे शक्य होत नाही. बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना एकटे शेतात जाणे अवघड होत आहे. 

मंत्री गडाख यांच्या बंगल्याजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाने तातडीने पिंजरा लावला. इतर ठिकाणीही पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतऱ्यांतून कायम होते. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. बिबट्या नरभक्षक बनत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याशिवाय पर्याय राहत नाही. एकदा माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात झाल्यानंतर तो कायम हल्ले करतो. त्यामुळे अशा बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करणे क्रमप्राप्त होते. महाराष्ट्रातही अशा अनेक घटनांत बिबट्यांकडून माणसाला प्राण गमवावे लागले आहेत. अनेक हल्ले होत असून, पिंजऱ्यात त्याला बंद करून सुरक्षित ठिकाणी पाठविले जात आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख