नगर : कोरोनाबाबत आघाडी सरकार केवळ चमकोगिरी करीत आहे. या सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नसल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पत्रकार पांडुरंग रायकर हे शासकीय अनास्थेचे बळी ठरले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील सुपुत्र पत्रकार पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन झाले. केवळ आॅक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, की पत्रकार रायकर यांना उपचाराबाबत योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळाले नाही. उपचाराच्या सुविधा नसलेल्या ठिकाणी त्यांना कोणी पाठविले, तेथेही त्यांची पैशाची अडवणूक झाली, हे खेदजनक आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्यांना आॅक्सिजन उपलब्ध असलेली रुग्णवाहिका मिळू नये, ही मोठी शोकांतिका आहे. कोरोनाच्या काळात सरकारने केवळ घोषणांचा पाऊस पाडला. हाॅस्पिटल व बेडबाबत आकडेवारी जाहीर करून केवळ चमकोगिरी केली. प्रत्यक्षात सामान्यांना उपचार मिळणे कठिण होत आहे. नगर जिल्ह्यात पत्रकार रायकर यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले. दुर्दैवाने समाजासाठी धावणाऱ्या पत्रकारावर अशी वेळ येते, ही अतिषय दुःखद घटना आहे. हे केवळ सरकारी अनास्थेमुळे होत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

