इंदोरीकर महाराजांसाठी आंदोलनात हा नेता अग्रभागी राहणार - This leader will be at the forefront of the movement for Indorikar Maharaj | Politics Marathi News - Sarkarnama

इंदोरीकर महाराजांसाठी आंदोलनात हा नेता अग्रभागी राहणार

शांताराम काळे
गुरुवार, 9 जुलै 2020

इंदोरीकर महाराजांवरील गुन्हे मागे घेऊन समाजात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देऊ नये. ते अकोलेचे भूमिपुत्र आहेत. हे खोटे गुन्हे मागे घेतले नाही, तर राज्यभर वारकरी आंदोलन उभारतील.

अकोले : समाजप्रबोधनकर निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर गु्न्हे दाखल होऊ नये म्हणून यापूर्वी अनेक राजकारणी पुढे आले होते. अखेर गुन्हा दाखल झाला. आता हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य वैभव पिचड यांनी रस्त्यावर येण्याची तयारी केली आहे. एव्हढेच नव्हे, वारकरी आंदोलन करतील आणि आपण त्यात अग्रभागी राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देवून त्यांनी त्यात इशारा दिला आहे. गुन्हे मागे घेतले नाही, तर वारकरी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. या वेळी दीपक देशमुख महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचाैरे आदी नेतेही उपस्थित होते. 

पिचड यांनी म्हटले, की निवृत्ती महाराज देशमुख हे राज्यातील उत्तम प्रबोधनकार आहेत. अनेकांचे उद्धवस्त झालेले संसार त्यांच्या प्रबोधनामुळे सुरळीत झाले आहेत.  गेली २५ वर्षे कीर्तनातून ते लोकांचे प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा अनेक लोकांना फायदा झालेला आहे. त्यांच्या प्रबोधनामध्ये ग्रंथ पुराणाचा संदर्भ असतो. त्याच अनुषंगाने त्यांनी सम विषम तारखेबद्दल आपले प्रबोधन केलेले आहे. त्यांचा त्यामागे समाजात कोणताही अपप्रचार करण्याचा हेतू नव्हता व नसेल. त्यांचे सामाजिक कार्य सर्व राज्यात सर्वश्रुत आहे. त्यांना राज्यात अनेक नामांकीत पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यांची वाढती सवंग लोकप्रियता ही त्यांच्या विरोधकांना खपत नाही त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची मानसिकता खराब करण्याचे काम चालू आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे.

इंदोरीकर यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन समाजात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देऊ नये. इंदोरीकर महाराज हे अकोलेचे भूमिपुत्र असल्याने जर हे खोटे गुन्हे मागे घेतले नाही, तर राज्यभर वारकरी आंदोलन उभारतील. त्यामध्ये आम्ही भूमिपुत्र म्हणून सर्वात अग्रभागी राहू, असेही पिचड यांनी म्हटले आहे.

इंदोरीकर महाराजांना साथ

अकोल्याचे भूमिपूत्र असल्याने आम्ही इंदोरीकर महाराजांसोबत आहोत. समाजातील काही अपप्रवृत्तीमुंळे वारकरी सांप्रदायावर आरोप होत आहेत. अशा प्रवृत्तींना योग्य पद्धतीने जागा दाखवून देवू. इंदोरीकर महाराजांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर आगामी काळात भव्य आंदोलन उभारले जाईल, अशा भावना कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख