अकोले : अकोले शहर काँग्रेस पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाउपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीमध्ये अकोल नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये १७ प्रभागातील आरक्षण सोडतीची चर्चा होऊन प्रभाग निहाय उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्यावतीने पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागात उमेदवार देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जे कोणी कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करु इच्छित असतील, त्या सर्वांचेच तालुका काँग्रेसवतीने स्वागत करण्यात येईल, असे या वेळी जाहीर करण्यात आले. अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसपक्षाच्यावतीने यांच्या आदेशाप्रमाणे अध्यक्षीय उमेदवार निवडला जाईल, असे बैठकीत ठरले.
अकोले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरात व आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजुटीने व जोमाने निवडणूक लढविण्याबाबत आदेश दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिनही पक्षांची महाविकास आघाडी आहे. मात्र थोरात यांच्याच तालुक्याजवळील अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत काॅेग्रेसने सवता सुभा केला आहे. त्यामुळे शिवसेनाही आपले स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. थोरात जरी राज्याचे नेतृत्त्व करीत असले, तरी त्यांच्या जवळच्या तालुक्यातच त्यांना कार्यकर्त्यांना एकत्रित करता येत नाही. साहजिकच तिनही पक्षातील बिघाडीचा परिणाम भाजपला होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेतृत्त्व माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडे एकहाती आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना या बिघाडीचा चांगला फायदा होणार आहे.
काॅंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिनही पक्ष एकत्र लढले, तर मात्र पिचड यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या उमेदवारांना पळता भुई थोडी होईल, अशी स्थिती आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार असताना व काॅंग्रेसचे मंत्री असताना त्यांना एकजुटीने राहता येत नाही. त्यामुळेच काॅंग्रेसने सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Edited By - Murlidhar Karale

