जानेवारीच्या अखेरीस जीवनातील शेवटचे उपोषण ! हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र - The last fast of life at the end of January! Hazare's letter to the Prime Minister | Politics Marathi News - Sarkarnama

जानेवारीच्या अखेरीस जीवनातील शेवटचे उपोषण ! हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

आपल्या सरकारने स्वामीनाथन आयोगाचा स्विकार केला आहे, तर त्याचे पालन होणे सुद्धा गरजेचे आहे.

पारनेर : प्रत्येकाला आपल्या श्रमाचे दाम मिळावे व कोणाचेही शोषण होऊ नये, ही लोक कल्याणकारी सरकारची जबाबदारी असते. आपल्या देशात जो जनतेचे पोषण करतो, त्याच शेतकऱ्यांचे शोषण केले जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, या साठी मी दिल्ली येथे सात दिवस उपोषण केले होते. त्या वेळी आपल्या कार्यालयाने लेखी आश्वासन दिले ते आपण पाळले नाही. म्हणून मी जानेवारी महिण्याच्या अखेरीस दिल्ली येथे पुन्हा माझ्या जीवनातील शेवटचे उपोषण करत आहे, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविले आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की दिल्ली येथे रामलिला मैदानावर 2018 साली मी सात दिवसांचे उपोषण केले, त्यावेळी केंद्रीय  कृषी मंत्री गजेंद्र शेखावत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्वासन घेऊन माझे उपोषण सोडण्यासाठी पाठविले होते. त्यात उल्लेख केला होता, की सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थिक बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे. असे लखी पत्र दिले होते ते पत्र सुद्दा मी आपणास माहितीस्तव पाठवत आहे. 

आपल्या सरकारने स्वामीनाथन आयोगाचा स्विकार केला आहे, तर त्याचे पालन होणे सुद्धा गरजेचे आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव द्यावा, असे सांगितले आहे. याच मागणीसाठी मी दिल्ली येथे रामलिला मैदानावर सात दिवसांचे उपोषण केले होते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव मिळावा, यासाठी राज्यात कृषीमूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोग शेतक-यांचा उत्पादनाचा सर्व खर्च गृहीत धरूण शेतीमालाच्या किंमतीची शिफारस केंद्र सरकारला करते, मात्र केंद्र सरकार त्यात 50 ते 55 टक्के कपात करते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच दीडपट बाजारभाव देण्याऐवजी केंद्र सरकार 50 टक्के किंमती कमी करते हे दुर्देव आहे.

मी या विषयी आपणास व केंद्रीय कृषीमंत्री यांनाही पाच वेळा पत्र पाठविले, मात्र एकदाही उत्तर आले नाही. त्यामुळे मी आता जनेवारी महिण्याच्या शेवटी जीवनातील शेवटचे उपोषण करणार आहे. ही गोष्ट आपल्या सरकारच्या द्रुष्टीने चांगली नाही, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. उपोषणासाठी मी रामलिल मैदान मिळावे म्हणून चार पत्रे सुद्धा पाठवली आहेत. 

गेल्या तीन वर्षात मला दिलेल्या लेखी अश्वासानाची पुर्तता केली जात नाही, तसेच पाठविलेल्या पत्रांची उत्तरेही दिली जात नाहीत, ही गोष्ट सुडबुद्धीने माझ्याबाबत केली जात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरीकाला कायद्याने अधिकार आहे. म्हणून शेतकरी हितासाठी मी आंदोलन करत आहे, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.  

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख