श्रीगोंदे : "कुकडी साखर कारखान्याच्या कारभारात गोंधळ आहे. शेतकऱ्यांची देणी वेळेवर मिळत नसून, कार्यक्षेत्रातील ऊसतोडणीत मनमानी झाली आहे. सोबत कोण असेल याचा विचार न करता, सामान्य सभासदांची सोबत घेऊन कुकडी कारखाना निवडणुकीत पॅनल उभे करू,'' अशी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकर पंधरकर यांनी व्यक्त केली.
माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी नुकतेच कुकडी कारखाना बिनविरोध करण्याबाबत सुतोवाच केले होते.
पंधरकर म्हणाले, ""कारखान्याची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडत आहे. विरोधकांना उमेदवार मिळू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी षडयंत्रही रचले; मात्र अशा राजकीय खेळ्यांना आम्ही पुरून उरणार आहोत. कारण, सामान्य सभासदाची भूमिका आमच्यासोबत आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. मात्र, त्यासाठी कारभार चांगला व पारदर्शी हवा. कारखान्यात पाच वर्षांत गोंधळच आहे.''
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताना सोबत कोण येणार, याचा विचार न करता निवडणूक लढविणारच, असे सांगत पंधरकर म्हणाले, ""ज्या गावात कुकडी कारखाना उभा आहे, त्या पिंपळगाव पिसे येथे यंदा 65 हजार एकर ऊस गाळपासाठी होता. मात्र, वीस हजार एकर ऊसच कुकडी कारखान्याला गेला. याशिवायचा ऊस बाहेरच्या कारखान्यांनी नेला. ही अवस्था असणाऱ्या कारखान्याची निवडणूक लढविली नाही, तर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहणार नाही. विरोधी उमेदवार मिळू नयेत यासाठी सत्ताधाऱ्यांनी महत्त्वाच्या लोकांचा ऊस जाणीवपूर्वक गाळपाला नेला नाही. सलग तीन वर्षे ऊस कारखान्याला घातला नसल्याने संबंधित सभासद उमेदवारी करू शकत नाही. या नियमाचा गैरफायदा घेण्यासाठी डाव टाकले गेले. तरीही पॅनल उभे करणार असून, निवडणूक लढवू.''
हेही वाचा...
श्रीगोंद्यात खावटी कर्जापोटी 120 कोटीची वसुली
श्रीगोंदे : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 157 कोटी रुपयांचे पशूपालन व खाद्यासाठी कर्ज वितरीत केले होते. चार महिन्यात दिलेल्या या कर्जाची परतफेड कशी होणार या विंवचेनेत असणाऱ्या बँकेला 31 मार्चला सुखद धक्का बसला. या कर्जापोटी 120 कोटी रुपयांची फेड करीत शेतकऱ्यांनी बँकेला आधार दिला.
लोणीव्यंकनाथ सेवा संस्थेने सहा कोटींचा भरणा करीत बँक पातळीवर शंभर टक्के वसुली देण्यात मोठी भुमिका बजावल्याचे बँकेचे विकास अधिकारी व्ही. बी. जगताप यांनी सांगितले.
गेल्यावर्षीच्या शेवटच्या काही महिन्यात जिल्हा बँकेने पशुपालन खेळते भांडवल या नावाखाली शेतकऱ्यांना खावटी कर्ज वितरीत केले होते. यात श्रीगोंद्यात 157 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. शेतकऱ्यांना आधार देण्यात बँक अधिकाऱ्यांसह बँकेचे तत्कालिन संचालक दत्तात्रेय पानसरे यांचा मोठा सहभाग होता. मात्र हे कर्ज 31 मार्चला फेडण्याची मुदत होती व ते कर्ज कोरोनाच्या विळख्याने शेतकरी कसे फेडणार याची भिती बँकेच्या अधिकाऱ्यांना होती. मात्र मार्च-एन्डच्या शेवटच्या दिवशी कर्जदार शेतकऱ्यांनी 120 कोटींचा भरणा करीत मोठी वसुली दिली.
जगताप म्हणाले, तालुक्यातील बहुतेक संस्थांनी चांगले सहकार्य केले. संस्था अध्यक्षांसह सभासदांनी विश्वास दाखवित हा भरणा केला. यात लोणीव्यंकनाथ सेवा संस्थेने सर्वात जास्त सहा कोटींचे खावटी कर्ज घेतले होते. ते सगळे वेळेत पुन्हा भरताना बँक पातळीवर शंभर टक्के वसूल दिला. यात अजून अनेक संस्थांनी शंभर टक्के वसुल दिला असून, ती आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
Edited By - Murlidhar Karale

