आमदार रोहित पवार यांच्या `सृजन`तर्फे कर्जतला कोविड सेंटर - Kovid Center in Karjat on behalf of MLA Rohit Pawar's 'Srujan' | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवार यांच्या `सृजन`तर्फे कर्जतला कोविड सेंटर

निलेश दिवटे
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या रुग्णांना अत्यावश्यक सुविधा आता कर्जत या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

कर्जत : येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ४० बेडचे कोविड सेंटर आमदार रोहित पवार यांच्या सृजन संस्थेच्यामार्फत सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन विद्या काकडे, डॉ. रोहित काकडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

विशेष म्हणजे सुरू करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नवीन ४० बीडचे ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असलेले कोविड सेंटर सुरू केले आहे. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे आधुनिक सेंटर कोठेही नाही आणि कर्जतसारख्या ग्रामीण भागामध्ये हे आमदार पवार यांनी सुरू करून सर्व समान्यांना दिलासा दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांना अत्यावश्यक सुविधा आता कर्जत या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

रोहित पवार म्हणाले, 'सुरू करण्यात आलेले हे कोविड सेंटर रुग्णांसाठी खुप गरजेचे असून, आता अत्यावश्यक रुग्णांना ऑक्सिजन सुविधाही पुरवण्यात येईल. हे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सर्व डॉक्टर्स, अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कोरोना या जीवघेण्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या हेतूने हे सेंटर निर्माण केले आहे.  

तालुक्यातील कोरोना अस्वस्थ रुग्णास नगर येथे न्यावे लागायचे. तेथे बेड उपलब्धता असेलच याची खात्री नसायची, मात्र आता ही सुविधा कर्जत येथे सुरू झाली आहे, अशी सुविधा देणारा कर्जत पहिलाच तालुका आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख