पारनेर : शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये 50 बेडचे कोवीड सेंटर उभारणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून, आपल्या देशात तसेच राज्यातही कोरोनाने हाहाकार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जाहिराती, फ्लेक्स लावून न करता सामाजिक उपक्रमांनी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे तालुक्यात कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय झाला आहे.
रक्तदान शिबिर, मास्क व 50 हजार सॅनिटायझरचे वाटप या निमित्ताने करण्यात येणार आहे. उद्या (ता. 27) होणाऱ्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. मनिषा उंद्रे, डॉ. श्रीकांत पठारे, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, राजेश गवळी, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत आदी उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाबाबत दाते म्हणाले, की या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधाही करण्यात येणार आहे. सर्व सुविधेसह आवश्यक औषधे, ड्राय फ्रुटस, उपयुक्त काढाही पुरविणार येणार आहे. तसेच रुग्णांना दररोजचा चहा, नास्ता व जेवणही मोफत दिले जाणार, अशी माहिती रामदास भोसले यांनी दिली.
या ठिकाणी रुग्णांना कोणतेही शुल्क न आकारता सर्व उपचार केले जाणार आहेत. या सुविधा रुग्णांना गरज आहे, तोपर्यंत विनाशुल्क पुरविणार आहेत.
Edited By - Murlidhar Karale

