कोरेगावकर उवाच ! मनोमिलनासाठी आलो, अर्थात शिवसेना ही राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार नाही - Koregaonkar Uvach! We came for reconciliation, of course Shiv Sena will not fall under the control of NCP | Politics Marathi News - Sarkarnama

कोरेगावकर उवाच ! मनोमिलनासाठी आलो, अर्थात शिवसेना ही राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार नाही

मुरलीधर कराळे
बुधवार, 15 जुलै 2020

``गेली 15 वर्षे औटी हे पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. त्यामुळे पारनेमध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत,`` असे कोरेगावकर यांनी म्हटले होते.

नगर : ``शिवसेनेशी त्या पाच नगरसेवकांचे मनोमिलन करण्यासाठी आलोय, याचा अर्थ शिवसेना ही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यात जाईल, असे मात्र मी होऊ देणार नाही,`` असे सांगून शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी पारनेर तालुक्याबाबत काळजी व्यक्त केलेली दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात गोंधळ उडवून देणाऱ्या पारनेरच्या पाच नगरसेवकाच्या पक्षांतराचा आणि पुन्हा घरवापसीचे प्रकरण रोज वेगवेगळे वळण घेत आहे. आज शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी पारनेर तालुक्यात तीन बैठका घेतल्या. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्याशी बैठक झाली. पारनेर तालुक्यातील शिवसेनेची घडी विस्कळू न देण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्यात चर्चा झाली असेलही, परंतु हे पाच नगरसेवकांचे करायचे काय, असा त्या चर्चेचा सूर असू शकेल. कारण हे सर्वजण मनाने पुन्हा औटी यांच्याकडे येतील की नाही, याबाबत शंकाच उपस्थित होणार आहे. आगामी पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत हे नगरसेवक शिवसेनेच्या वतीने उमेदवारी मागतील. साहजिकच औटी त्यांना उमेदवारी देतील का, की त्याबाबतचा शब्द हे नगरसेवक आताच त्यांच्याकडून घेतील, याबाबतही आगामी काळात खल होऊ शकेल. आजच्या औटीशी झालेल्या गोपनीय बैठकिचे इतिवृत्त कोरेगावकर यांनी सांगिकला नाही, मात्र त्यांच्या बोलण्यातून पारनेरच्या शिवसेनेविषयी काळजी मात्र नक्कीच जाणवत आहे. 

``गेली 15 वर्षे औटी हे पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. त्यामुळे पारनेमध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत,`` असे कोरेगावकर यांनी म्हटले होते. याचाच अर्थ पारनेरच्या शिवसेनेची वरिष्ठ नेत्यांना काळजी वाटत आहे, असाच राजकीय धुरिणांनी काढला आहे. आगामी काळात शिवसेनेला ताकद देण्यासाठी राज्य पातळीवरून काय उपाययोजना केल्या जातात, याबाबत आगामी काळात दिसून येणार आहे.

या प्रकरणाचा परिणाम आता तालुक्यातील इतर ग्रामपंचायती व सेवा संस्थांच्या निवडणुकांवरही होणार आहे. त्यामुळे तालुक्यावर पकड कोण ठेवणार, राष्ट्रवादी की शिवसेना, हे आगामी काळात ठरणार आहे.

आमदार लंके यांच्याशी काय झाली चर्चा

आमदार लंके व संबंधित नगरसेवकांशी कोरेगावकर यांनी चर्चा केली. खऱं तर यापूर्वीही त्यांची चर्चा झालेली असेलही, मात्र या नगरसेवकांनी मनाने शिवसेनेत यावे, हाच यामागचा उद्देश आहे. आमदार लंके यांनी या नगरसेवकांना मनाने शिवसेनेत पाठवावे, असेच त्यांचे म्हणणे असावे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख