कोपरगाव : आठ दिवसातून एकदा पाणी, अशी स्थिती असलेल्या कोपरगावचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आज दुसरे महत्वाचे पाऊल उचलले.
यापूर्वी पालिकेच्या साठवण तलावाची निम्मी खोदाई मोफत केली होती. आज त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राजेंद्र भोसले यांनी याकामाचे अंदाजपत्रक आठ दिवसात सादर करण्याचे आदेश जिवन प्राधिकरणाला दिले.
पहिले पाऊल उचलताना त्यांना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी मदत केली. तर उर्वरीत कामासाठी निधी मिळावा, यासाठी आमदार काळे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले. मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्याकडेही पाठपुरावा सुरू ठेवला. यापूर्वी ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला सूचना दिल्यानंतर तलावाच्या विस फुट खोदाईचे काम मोफत झाले.
आणखी विस फुट खोदाई व कॉंक्रेटीकरणासाठी पन्नास कोटी खर्च अपेक्षीत आहे. हे काम झाले, तर कोपरगावला दिवसातून दोन वेळा पाणी मिळू शकेल. या तलावाच्या शेजारून जलदगती कालवा वाहतो. खास बाब म्हणून त्यातून पाणी घेण्याची परवानगी मिळाली, तर पाणी उचलण्याचा कुठलाही खर्च न करता हा तलाव भरता येईल. या तलावातूनच चार क्रमांकाचा तलावही भरता येईल. या कामाचे अंदाजपत्रक सरकार दरबारी सादर झाले की निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे सोपे होईल.
जिल्हाधिकारी भोसले यांनी या तलावाच्या कामास भेट देऊन पहाणी केली.
आमदार काळे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ. अजय गर्जे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरम बागरेचा, सुनील गंगुले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, प्रशांत वाबळे, अनिल सराफ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते.
शहरासाठी धरणात पाणी आरक्षीत आहे. धरणे भरलेली असताना, केवळ पाणीसाठवण क्षमता अपुरी असल्याने शहरात पावसाळ्यातही वर्षानुवर्षे पाणी टंचाई असते. पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम पूर्ण करून पाणी टंचाई कायमची दूर करायची हे माझे उद्दीष्ट आहे. त्यासाठी पाठपूरावा सुरू आहे, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
Edited By- Murlidhar Karale

