कोल्हापूरच्या स्वागत तोडकरप्रकरणी आरोग्य विभागाने पवित्रा बदलला - Kolhapur's Swagat Todkar case was changed by the health department | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरच्या स्वागत तोडकरप्रकरणी आरोग्य विभागाने पवित्रा बदलला

शांताराम काळे
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

मुळचा कोल्हापूर येथील नॅचरोपॅथी या शाखेची पदवी घेतलेल्या स्वागत तोडकर या तथाकथीत डॉक्टर विरोधात गुन्हे दाखल आहेत.

संगमनेर : कोरोना प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधाच्या सोशल मिडीयावरील जाहिरातीच्या प्रकरणाचे विविध पैलू समोर आले असून, घारगाव येथील मेडिकल स्टोअर्सच्या मालकाने या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे या जाहिरात प्रकरणाची सर्व बाजूंनी समग्र माहिती घेवून, शहानिशा केल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला आहे. 

मुळचा कोल्हापूर येथील नॅचरोपॅथी या शाखेची पदवी घेतलेल्या स्वागत तोडकर या तथाकथीत डॉक्टर विरोधात गुन्हे दाखल आहेत. या व्यक्तीने टोनो - 16 हे आयुर्वेदीक औषध कोरोना प्रादुर्भावात रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवित असल्याचा दावा करणारी ध्वनिचित्रफीत यु- ट्यूब या समाजमाध्यमावर टाकली होती. हे औषध संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील गुरुदत्त मेडिकलमध्ये विक्रीला उपलब्ध असल्याचा उल्लेख फेसबुकवर पाहून या प्रकरणाची तक्रार आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्याने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे केली होती. त्यांच्या सुचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ढेरंगे यांना या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा आदेश दिला होता. मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. 

या प्रकरणी घारगावच्या औषध विक्रेत्याने या प्रकरणाशी आपला संबंध नसून, हे औषध आपल्याकडे विक्रीला नाही. तसेच ती जाहीरातही आपण केलेली नसल्याचे सांगत, आपल्याकडे केवळ शासकिय परवानगीनुसारच औषधे विक्रीला ठेवण्यात येत असल्याचा खुलासा लेखी पत्रान्वये केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची रितसर चौकशी करुन शहानिशा झाल्यानंतरच पुढील कारवाई करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख