नगर : कोजागिरी पाैर्णिमेनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याचा फटका अकोळनेर (ता. नगर) येथील अनेक लोकांना बसला आहे. गावातील 44 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, इतर 128 अहवाल येणे बाकी आहे. आज पुन्हा या गावात अॅंटिजेन तपासणी करण्यात येणार आहे.
अकोळनेरमध्ये संध्या सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. आज गावात पुन्हा सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. कालच्या तपासणीत 44 रुग्ण आढळले. अजून 128 लोकांचा अहवाल येणे बाकी असून, आज दिवसभरात गावातील सर्वच लोकांची तपासणी करण्याचे नियोजन असल्याचे सरपंच सविता मेहेत्रे यांनी सांगितले.
कोजागिरी पाैर्णिमेनिमित्त गावात भजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील वृद्ध मंडळींची संख्या मोठी होती. गेल्या तीन दिवसांत काही लोकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. ते कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने काल अनेकांची तपासणी करण्यात आली. कोरोनाचा फैलाव झाल्याने ऐन दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील लोक बाहेर जाणार नाहीत, तसेच बाहेरील लोकही गावात येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
अकोळनेर हे नगर शहरापासून जवळच आहे. एका लहान गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने पंचक्रोशितील गावांनीही धास्ती घेतली आहे. नगर शहरातही कोरोना रुग्ण वाढण्याची भिती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असतानाच काल अचानक वाढलेले रुग्ण आता जिल्ह्याची डोकेदुखी ठरणार आहे. याबरोबरच संगमनेरमध्येही रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. दीपावलीच्या खरेदीनिमित्त लोक बाहेर पडत असून, बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत. लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रमातही नियमांचे पालन केले ऩसल्याचे दिसून येत आहे.
काल जिल्ह्यात 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण 258 बाधितांची कोरोना रुग्णसंख्येत भर पडली असून, आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55 हजार 545 आहे. सध्या 1 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 887 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत 57 हजार 825 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या एक महिन्यांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट युरोपिय देशांत येत असल्याने भारतातही असे रुग्ण वाढतील, अशी भिती व्यक्त होत आहे. आगामी काळात थंडीमुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून, त्यातच कोरोनाचीही बाधा वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

