नगर : शेतकऱ्यांच्या नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा रेल्वे मंत्रालयाने सुरु केली आहे. या किसान रेल्वेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील सर्व प्रकारचा भाजीपाला आणि फळे, फुलांची वाहतूक इतर राज्यात सुरक्षित आणि वेगाने पोहोचण्यासाठी ही खास रेल्वे गाडी सुरु झाली आहे. त्यामुळे नगरचा माल आता मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेशला पाठविणे शक्य होणार आहे.
नगरमधील शेतकरी, व्यापारी या पार्सल गाडीचा लाभ घेत आपला माल या गाडीद्वारे इतर राज्यात पाठवत आहेत. दर मंगळवारी कोल्हापूर हून सुटून दुपारी दोन वाजता किसान ट्रेन नगर रेल्वे स्थानकावर येईल. तर प्रत्तेक शुक्रवारी मनमाड येथून रात्री दहा वाजता नगर स्थाकावर येईल. या विशेष रेल्वे गाडीचे नगर रल्वे स्थाकावर स्वागत करण्यात आले असून, पार्सल डब्याची पूजा करून स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर व मुख्य वाणिज्य निरिक्षक रामेश्वर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गाडीत शेतकऱ्यांची उत्पादने भरण्यात आली.
नगर जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी वर्गाला भरतातील मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात आपला माल पाठवता येणार आहे. कोल्हापूर ते मनमाड जाणारी गाडी 25 सप्टेंबरपर्यत धावणार असून, मनमाड ते कोल्हापूर जाणारी गाडी 27 सप्टेंबर पर्यंत धावणार असल्याने नगर जिल्ह्यातील जास्तीतजास्त छोट्या मोठ्या शेतकरी व व्यापारी वर्गानी या विशेष पार्सल रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

