बिबट्याला धरा किंवा मारा, पण माणसांचे जीव वाचवा : मंत्री तनपुरे - Kill the leopard, but save the lives of the people: Minister Tanpure's order | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

बिबट्याला धरा किंवा मारा, पण माणसांचे जीव वाचवा : मंत्री तनपुरे

राजेंद्र सावंत
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

शिरापूर येथील पानतसवाडी येथील सार्थक संजय बुधवंत याला गुरुवारी बिबट्याने उचलून नेले होते. सकाळी सातच्या सुमारास सार्थकचा मृतदेह शेतात सापडला.

पाथर्डी : "तालुक्‍यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला. आता चौथा बळी जाणार नाही, याची काळजी वन अधिकाऱ्यांनी घ्यावी. बिबटे पकडा किंवा नरभक्षक जाहीर करून परवानगी घेऊन ठार करा; मात्र आता कोणाचाही बळी जाता कामा नये. औरंगाबाद व अन्य जिल्ह्यांतील तज्ज्ञांची पथके बोलवा. वन विभागाचे जे अधिकारी नागरिकांना सहकार्य करणार नाहीत, त्यांची चौकशी करून कारवाई करू,'' असा इशारा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. 

शिरापूर येथील पानतसवाडी येथील सार्थक संजय बुधवंत याला गुरुवारी बिबट्याने उचलून नेले होते. सकाळी सातच्या सुमारास सार्थकचा मृतदेह शेतात सापडला. त्यामुळे शिरापूरचे ग्रामस्थ संतप्त झाले होते. वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मढीची श्रेया साळवे, केळवंडीचा सक्षम आठरे व शिरापूरचा सार्थक बुधवंत यांचा बिबट्याने बळी घेतला. सार्थकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. वन विभागाचे अधिकारी व पोलिसांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

मंत्री तनपुरे आज दुपारी बारा वाजता शिरापूरच्या पानतसवाडी येथे आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली. नरभक्षक बिबट्यांना पकडा अथवा ठार करण्याच्या सूचना वन विभागाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांशी संवाद साधून दिल्या. वन विभागाचे अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असता, याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे ते म्हणाले. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात सार्थकच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यावर सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. नुकतेच एका चिमुरड्याला त्याच्या आईसमोरून उचलून नेले. आतापर्य़ंत तीन बळी गेले आहेत. गर्भगिरी डोंगररांगेत असलेल्या गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्या ऊसाच्या शेतातही लपून बसत असल्याने शेतात राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. डोंगरात लपण्यासाठी बिबट्याला मोठी जागा आहे. उंच डोंगर असल्याने तो पिंजऱ्यात सापडणेही अशक्य होणार आहे. त्यामुळे आगामी काळात बिबट्यापासून संरक्षण करायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. 

यापूर्वी वनविभागाला सांगूनही विशेष उपयोग झाला नाही. पिंजरे लावूनही बिबट्या त्यामध्ये अडकत नसल्याने अधिकाऱ्यांचेही प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. बिबटे पाळीवर प्राण्यावर हल्ले करतात. परंतु आता माणसांवरही हल्ले होऊ लागले असल्याने डोंगरी भागातील गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख