अपहरणाचा सस्पेंस कायम ! सरपंच-उपसरपंच निवडले, तरीही ते दोघे गायबच - Kidnapping suspense remains! Sarpanch-Deputy Sarpanch was elected, but they both disappeared | Politics Marathi News - Sarkarnama

अपहरणाचा सस्पेंस कायम ! सरपंच-उपसरपंच निवडले, तरीही ते दोघे गायबच

अनिल चाैधरी
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर सतरा सदस्यापैकी अपहरण नाट्यातून गायब असल्याने दोघा सदस्यांनी या निवडीला दांडी मारली.

निघोज : दोन दिवसांपूर्वी खेड येथून अपहरण करण्यात आलेले गणेश कवाद व दिंगबर लाळगे हे दोघे सदस्य आज निवडीसाठी येतील, असा अनेकांचा अंदाज होता. प्रत्यक्ष निवडीसाठी हजर झाल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून अपहरण झालेले दोन्ही सदस्य आजच्या निवडीला गैरहजरच राहले. त्यामुळे निवडीसाठी अवतरणार, अशी आशा बाळगून असलेल्या ग्रामस्थांचा हे सदस्य आलेच नसल्याने हिरमोड झाला. त्यामुळे या सदस्याचे अपहरण झाले किंवा ते स्वतः विरोधी गटात सामील झाले, हे मात्र अद्याप गुलदस्त्याच राहिले. त्यामुळे या दोघा सदस्याबाबतचे सस्पेन्स कायम आहे. 

संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या अतिशय तणावपूर्ण वातावरणात निवड प्रक्रीया पार पडलेल्या अन् दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण झाल्याने चुरशीच्या ठरलेल्या निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चित्रा सचिन वराळ, तर उपसरपंचदी माऊली उर्फ ज्ञानेश्वर वरखडे यांची निवड झाली आहे.

निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर सतरा सदस्यापैकी अपहरण नाट्यातून गायब असल्याने दोघा सदस्यांनी या निवडीला दांडी मारली.

निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीसाठी आज येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वीचित सदस्याची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून संभाजी झावरे यांनी काम पाहीले.

निघोजचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने सरपंचपदासाठी चित्रा सचिन वराळ, सुधामती विठ्ठल कवाद व अविता शंकर वरखडे यांनी अर्ज दाखल केले, तर उपसरपंचपदासाठी ज्ञानेश्वर वरखडे व शंकर गुंड यांनी अर्ज दाखल केले. छाणनीनंतर अविता वरखडे यांनी माघार घेतल्याने चित्रा वराळ व सुधामती कवाद यांच्यामध्ये सरळ लढत रंगली. 

या वेळी झालेल्या मतदानात सरपंचपदासाठी चित्रा वराळ यांना नऊ तर विरोधी सुधामती कवाद यांना सहा मते मिळाली. तर उपसरपंचपदासाठी ज्ञानेश्वर वरखडे यांना नऊ तर शंकर गुंड यांना सहा मते. मिळाली संदिप वराळ पॅनलचे आठ सदस्य असताना प्रत्यक्ष निवडीत वराळ व वरखडे यांना नऊ मते मिळाली. विरोधी गटातूनच एक मतदान झाल्याने आता कोण फुटले, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणूक निर्णय आधिकारी संभाजी झावरे यांनी सरपंचपदी चित्रा वराळ व उपसरपंचपदी ज्ञानेश्वर वरखडे यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान निवड प्रक्रिया सुरु असताना व निर्धारीत वेळेपेक्षा जास्त उशिर झाल्याने या निवडीचा निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याने तहसिलदार ज्योती देवरे यांनी हा परिसर प्रतिबंधक म्हणून घोषित केला. तसेच उल्लघन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले.

या ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख