आमच्यावर खुशाल गुन्हे दाखल करा, शेतकरी प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर येणारच - Khushal, file a case, we will come to the streets for farmers' questions | Politics Marathi News - Sarkarnama

आमच्यावर खुशाल गुन्हे दाखल करा, शेतकरी प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर येणारच

शांताराम काळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तर बिनधास्त करा. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.

अकोले : सोने गहाण ठेवून उसने पैसे घेवून बियाणे, खते आणले. तेही वायाला  गेले. सरकार काहीच करीत नाही. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तर बिनधास्त करा. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.

पिचड यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालयात सरपंचाचे व शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत तुम्ही कुठपर्यंत कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार आहेत, असा सवाल केला. सात दिवसाचा अल्टिमेट देत मी पुन्हा येईल, असे सांगत आक्रमक झाले.

अकोले तालुक्यातील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आला असेल, तर अधिकारी पंचनामे का करत नाहीत? अधिकारी कुठे गेले? लोकप्रतिनिधी कुठे आहेत? असे विचारत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पुढील सात- आठ दिवसांत जर भातशेतीचे पंचनामे झाले नाही, तर अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. वैभव पिचड यांनी ठणकावून सांगितले. समवेत सर्व सरपंच तसेच सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे उपस्थित होते.

तालुक्यात ५ महिने पूर्ण झाले, तरी रोजगार हमीचे कामे सुरु नाहीत. खावटी नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. कोरोनाचे संकट त्यात वरून राजाची साथ नाही. रोपे सडून जात आहेत. काही शेतकरी पेरणीच्यासाठी आभाळाकडे डोळे लावून पाहत आहेत. सरकार व प्रशासन याबाबीकडे डोळेझाक करीत असेल, तर न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पिचड यांनी दिला.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख