शिर्डी : "विजयी झालात, तुमचे अभिनंदन; मात्र पराभूत झाले तेही आपलेच आहेत, हे लक्षात ठेवा म्हणजे झाले. निवडणुका संपल्या, मतभेद विसरा. विकासाची चावी हाती आली, आता गावात रोजगारनिर्मिती करता येते का, ते पाहा. त्यासाठी तुम्हा सर्वांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी पाठवू,'' अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नूतन ग्रामपंचायत सदस्यांना कानमंत्र दिला.
राहाता तालुक्यातील 25 पैकी 23 ग्रामपंचायतींवर विखे गटाने वर्चस्व सिद्ध केले. नूतन सदस्यांच्या सत्कार समारंभात विखे पाटील बोलत होते. तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीत विरोधकांचे अस्तित्व नाही. त्यामुळे विखे गट विरुद्ध विखे गट, अशीच लढत होते. या पार्श्वभूमीवर पराभूत झाले, तेही आपलेच आहेत, याची जाणीव विखे पाटील यांनी नूतन सदस्यांना जाणीवपूर्वक करून दिली. त्यांच्या डोळ्यासमोर ग्रामपंचायतीसह विधानसभा निवडणूक असते. त्यामुळे दोन्ही गट आपलेच, याची जाणीव त्यांना सदैव ठेवावी लागते.
निवडणुकीनंतर नवे सरपंच खुर्चीवर बसले, की ते विरोधक तर फार दूर, निवडून आलेल्या अन्य सदस्यांनाही विचारत नाहीत. सरपंच त्याचे एक-दोन साथीदार आणि ग्रामसेवक मिळून एकतर्फी कारभार हाकतात. त्यामुळे बऱ्याचदा "हेची फळ काय मम तपाला..' असे म्हणण्याची वेळ अन्य सदस्यांवर येते. हे टाळण्यासाठी आमदार विखे पाटील यांनी यंदा सर्व सदस्यांना म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण द्यायचे ठरविले असावे.
आता अडचण एवढीच आहे, की नूतन सदस्य प्रशिक्षित झाले, तर आणखी जागरूक होतील. सरपंच मनमानी करू लागला, तर त्याला चाप लावण्यासाठी एकत्र येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडून येणाऱ्या सदस्यांना म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण देण्याचा मनोदय विखे पाटील यांनी यापूर्वीच्या प्रत्येक निवडणूक निकालानंतर व्यक्त केला आहे. यंदा तसा योग खरेच आला, तर प्रशिक्षणानंतर कारभारात नेमका काय फरक पडतो, हे कळू शकेल.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गणेशचे अध्यक्ष मुकूंद सदाफळ, उपाध्यक्ष प्रताप जगताप, विश्वास कडू, नंदकुमार राठी, नंदा तांबे, भाऊसाहेब जेजूरकर, ऍड.रघूनाथ बोठे, शिर्डीचे उपनगराध्यक्ष हरिशचंद्र कोते आदि पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते. डॉ.भास्कर खर्डे यांनी प्रास्ताविक केले.
महिलांना कारभार पाहू द्या
गावपातळीवर महिला सदस्यांची संख्या बरोबरीने असते. प्रत्यक्षात त्या बाजुला असतात, पुरूष मंडळीच कारभार पहातात. हे चित्र बदलायला हवे. निवडून आलेल्या महिलांना कारभार पहाण्याची संधी मिळायला हवी, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी व्यक्त केले.
Edited By - Murlidhar karale

