नगर : केडगाव येथील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी उपमहापाैर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.
केडगाव येथे 7 एपिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्हातील आरोपीला अटक झाली असली, तरी यातील संशयीत आरोपी म्हणून सुवर्णा कोतकर यांचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतकर फरार आहेत. मागील महिन्यात त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला होता. या विरोधात तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज केला होता.
आज कोतकर यांच्या वतीने नितीन गवारे, तसेच सरकारी पक्षाच्या वतीने केदार केसकर यांनी युक्तीवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला असल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, या हत्याकांडामुळे नगर जिल्ह्यात आंदोलने झाली. शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी राजकीय नेत्यांनाही अटक करण्यात आली होती. हे प्रकरण महाराष्ट्र राज्यभर गाजले. दिवसा झालेली ही हत्या पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकणारी ठरली होती. मुख्य आरोपीपर्यंत पोहचणे पोलिसांना एक आव्हान बनले असून, कोतकर यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे.
हेही वाचा...
नगर-दौड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबेना
श्रीगोंदे : भरधाव जाणाऱ्या टेम्पोने ऊस घेऊन जाणाऱ्या दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात चार ऊसतोडणी मजूर व तीन बैल गंभीर जखमी झाले. नगर-दौंड महामार्गावरील ढोकराई फाट्याजवळ आज (मंगळवारी) पहाटे हा अपघात झाला.
रामदास गोरख महाजन, मनीषा रामदास महाजन, बाबासाहेब नागरगोजे, सुनीता नागरगोजे (रा. खिळद, ता. आष्टी, जि. बीड) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना दौंडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बैलगाड्यांची मोडतोड झाली आहे.
नागवडे साखर कारखान्यावर ऊस भरण्यासाठी पहाटे बैलगाड्या काष्टीकडे जात होत्या. या वेळी मागून आलेल्या टेम्पोने (एमएच-12, एफझेड 5736) बैलगाड्यांना जोराची धडक दिली. टेम्पोचालक भास्कर जगन्नाथ ठाकरे (रा. साक्री, जि. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच महामार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारात, चार दिवसांपूर्वी मालमोटारीच्या धडकेत चार तरुणांचा बळी गेला आहे.

