कर्जतच्या `लेडी सिंघम` अर्चना नष्टे अशा बनल्या आदर्श उपजिल्हाधिकारी - Karjat's 'Lady Singham' Archana Nashte became such an ideal Deputy Collector | Politics Marathi News - Sarkarnama

कर्जतच्या `लेडी सिंघम` अर्चना नष्टे अशा बनल्या आदर्श उपजिल्हाधिकारी

निलेश दिवटे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

प्रांताधिकारी अर्चना नष्टे या `लेडी सिंघम` म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या आहेत. त्या २०१४ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण आहेत.

कर्जत : `लेडी सिंघम` म्हणून परिचित असलेल्या येथील प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्काराने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरवर्षी महसूल दिनाचे औचित्य साधत नाशिक महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा गौरव करण्यात येतो.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याबरोबरच तहसील कार्यालयातील परमेश्वर पाचारणे यांना देखील आदर्श मंडळाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. या दोघांचा सन्मान झाल्याने महसूल विभागाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे या `लेडी सिंघम` म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या आहेत. त्या २०१४ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण आहेत. यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे परिविक्षाधीन प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले असून, जून २०१७ साली त्या कर्जतच्या प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. जामखेडची कोरोना साखळी तोडण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

आदर्श प्रांताधिकारी हा सन्मान मिळविणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या आहेत. त्यांचे वडील सेवानिवृत्त केंद्र शिक्षक आणि आई गृहिणी आहे. हे वृत्त त्यांना समजताच उभयतांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आणि लेकीने मोठं नावं काढलं, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हा सन्मान कर्जत-जामखेडकरांचा

मला मिळालेला सन्मान हा माझा नसून पूर्ण कर्जत- जामखेड उपविभागातील प्रत्येकाचा आहे. त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच, मात्र त्यामुळे वाढलेल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे. आगामी काळात दोन्ही तालुक्यात प्रशासन वेगळे काम करून आदर्श निर्माण करणार आहे, असे अर्चना नष्टे यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख