नगर : भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे गाव असलेल्या बुऱ्हाणनगर येथे कर्डिले गटाला आव्हान देत त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री प्राजक्त तनपुरं यांच्या गटाने प्रचाराचा नारळ वाढविला. मंत्री तनपुरे यांच्या मातुश्री माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम झाला.
नगर तालुक्यातील बुऱ्हानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज सकाळी तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांच्या हस्ते झाला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, राहुरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, अमोल जाधव, अॅड. विजय भगत, बाबासाहेब कर्डिले, अॅड. अभिषेक भगत, रोहिदास कर्डिले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह शिवसेनेचे नगरसेवक, स्थानिक नागरिक व उमेदवार उपस्थित होते. माजी आ.शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला खरपूस समाचार घेतला.
जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, की बुऱ्हाणगरच्या ३० वर्षाच्या इतिहासात प्रथमच लोकशाही पद्धतीने ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे येथील नेत्यांच्या दडपशाही व गुंडशाही न घाबरता बुऱ्हाणगरची जनता या निवडणुकीत निर्भीडपणे मतदान करतील. मंत्री प्राजक्त तनपुरे व आम्ही मिळून यात लक्ष घालणार असून, शेतीकडे वळवलेले पाणी बुऱ्हानगरच्या नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत.
अॅड. दुसुंगे म्हणाले, की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये या गावातील सद्दामशाही आता संपणार आहे. तालुक्याचा विकास दादापाटील शेळके यांनीच केला.
रोहिदास कर्डिले म्हणाले, की बुऱ्हाणगरच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मी व माझ्या पत्नीने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून सूड बुद्धीचे राजकारण करत अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायदेवतेने मला न्याय दिल्याने आमचे अर्ज वैध ठरले आहेत. बुऱ्हाणगरची सर्व जनता आमच्याबरोबर आहे.
बुऱ्हाणनगरच्या जनतेच्या सोबत तनपुरे कुटुंब
बुऱ्हाणनगरच्या विकासासाठी आता परिवर्तन घडवत महाविकास आघाडीला जनतेने साथ द्यावी, बुऱ्हानगरच्या ग्रामस्थांच्या बरोबर संपूर्ण तनपुरे कटुंब आहे, असे राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी सांगितले.

