या गावांत कर्डिले हेच आमदार ! पाचपुते कुठे कमी पडले? - Kardile is the only MLA in this village! Where did Pachpute fall short? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

या गावांत कर्डिले हेच आमदार ! पाचपुते कुठे कमी पडले?

मुरलीधर कराळे
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप कार्यक्रम नुकताच आगडगाव (ता. नगर) येथे झाला. या वेळी काही ग्रामस्थांनी कर्डिले यांना थेट याच मतदारसंघातून लढण्याची गळ घातली.

नगर : नगर तालुक्यातील बहुतेक गावांवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचेच वर्चस्व असल्याचे अनेकदा सिद्ध होत आहे. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात असलेल्या काही गावांमध्ये अद्यापही कर्डिले यांनाच लोक आमदार मानतात. या मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते इकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे `कर्डिले साहेब, पुढच्या वेळेस तुम्ही श्रीगोंद्यातूनच लढा,` अशी हाक अनेक गावांतून व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप कार्यक्रम नुकताच आगडगाव (ता. नगर) येथे झाला. या वेळी काही ग्रामस्थांनी कर्डिले यांना थेट याच मतदारसंघातून लढण्याची गळ घातली. ``आता यापुढे राहुरी मतदारसंघ सोडा. श्रीगोंद्यातून लढा. आतापर्यंत आम्ही तुमचे ऐकले. भाजपच्याच आमदाराला निवडून दिले. परंतु इथल्या प्रश्नांसाठी तुमच्याशिवाय पर्याय नाही,`` असे एका शेतकऱ्याने सांगताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

आगडगाव व पंचक्रोशितील या गावांवर गेल्या 25 वर्षांपासून कर्डिले यांचेच वर्चस्व होते. मतदारसंघाची विभागणी झाल्यानंतर श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात ही गावे गेली. कर्डिले यांचे बुऱ्हाणनगर हे गाव मात्र राहुरी विधानसभा मतदारसंघात गेले. कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून लढवून ते आमदार झाले. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला असला तरीही पंचक्रोशितील गावांमध्ये कर्डिले हेच आमदार असल्याचे ग्रामस्थांना वाटते.

श्रीगोंदे मतदारसंघातील आगडगाव व पंचक्रोशीतील काही गावे शेवटचीच आहेत. आमदारांकडे एखादा प्रश्न घेऊन जायचा असेल, तर थेट श्रीगोंदे येथे आमदार बबनराव पाचपुते यांना भेटायला जायचे. इतके दूरचे अंतर पार करणे येथील ग्रामस्थांना शक्य होत नाही. तसेच आमदार पाचपुतेही इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे सर्व लहान मोठ्या कामांसाठी कर्डिले यांच्याच बंगल्यावर ग्रामस्थ गर्दी करतात. कर्डिले सध्या माजी आमदार आहेत, तथापि, त्यांच्या बंगल्याजवळचा दरबार अजूनही भरतो आहे. लोक अजूनही विविध प्रश्न घेऊन त्यांच्या बंगल्यावर गर्दी करतात. कर्डिलेही संबंधितकामासाठी अधिकाऱ्यांना लगेचच फोन करून तो प्रश्न सोडवितात. त्यामुळेच या पंचक्रोशीतील ग्रामस्थ कर्डिले हेच आपले आमदार असल्याचे सांगतात.

बबनराव पाचपुते कुठे कमी पडले

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते या गावांचे आमदार आहेत, मात्र निवडणुकीनंतर ते इकडे विशेष फिरकले नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपले आमदार कोण आहेत, असे विचारले असता ते कर्डिल यांचेच नाव घेतात. अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक कामांसाठी ग्रामस्थ पाचपुते यांच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. या गावांपासून श्रीगोंदेपर्यंतचे अंतर पार करणे लोकांना शक्य नाही. ठराविक कार्यकर्ते सोडले, तर पाचपुते यांच्याशी कोणाचाच संपर्क होत नसल्याची भावना ग्रामस्थांची होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख