नगर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकारने कायम दुजाभाव केला. भाजपच्या काळात खतांसाठी शेतकऱ्यांना केधीही रांगा लावाव्या लागल्या नाहीत. आता मात्र शेतकरी हतबल झाला आहे. बियाणे कंपन्यांकडून फसवणूक, दुधाचे दर घसरले त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल करून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले कडाडले. आता दूध ओतलेय, आगामी काळात आंदोलन अधीक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला.
दुधाला दर वाढून मिळावेत, अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलने झाली. भाजप नेत्यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. दगडाला दुग्धाभिषेक घालून आंदोलने केली. रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. राहुरी व नगर तालक्यातील काही गावांमध्ये कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलने झाले. यावेळी कर्डिले यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला.
राहुरी येथील बाजार समितीसमोर आंदोलन झाले. या वेळी कर्डिले यांच्याबरोबर रासपाचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रविंद्र म्हसे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश पवार, रिपब्लिकनचे अरुण साळवे, सुवर्णा जऱ्हाड, रेखा नरवडे, बबन कोळसे, संदीप गीते, शहाजी ठाकूर, योगेश देशमुख, गणेश खैरे, ज्ञानदेव क्षीरसागर, सुरसिंग पवार तसेच शेतकरी उपस्थित होते. नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
कर्डले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. दुधाचे दर 18 रुपयांपर्यंत घसरले आहेत. दूध भुकटी निर्णायातील प्रति किलो 50 रुपये व दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर 10 रुपये अनुदान सरकारने द्यायला हवे. सरकारला यापूर्वीही निवेदन दिले होते, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. यापूर्वी भाजपने शेतकऱ्यांना खतांसाठी केव्हाही रांगेत उभे केले नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी संकटात आहे. व्यापारी, सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत असताना त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.
नगर- जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी येथे भाजपचे तालुकाप्रमुख मनोज काकाटे यांच्या उपस्थितीत दूध ओतून आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या.

