पारनेर : के. के. रेंजमुळे पारनेरसह नगर व राहुरी तालुक्यातील 27 गावातील ग्रामस्थांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात विस्थापीत होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत के. के. रेंजसाठी होणारे जमिनीचे अधिग्रहण थांबवावे, हा शेतक-यांच्या व या गावात राहाणा-या नागरीकांच्या द्रुष्टीने जीवन मरणाचा प्रश्न आहे. यात आपण लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्याकडे केली. त्या वेळी पवार यांनी पुढील आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन यात मार्ग काढला जाईल, असे अश्वासन दिले.
के. के. रेंज विस्तारीकरणासाठी पारनेर, नगरसह राहुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या कसदार व चांगल्या जमिनीचे अधिग्रहण होणार आहे. या विरोधात सर्व शेतकरी व या गावातील नागरीक एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांनी बुधवारी (ता. 9) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी पवार यांनी वरील अश्वासन दिले.
यापुर्वीही जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या जमिनी के. के. रेंजसाठी गेल्या आहेत. आता नव्याने सुमारे 25 हजार हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्यासाठी विस्तारीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात राहुरी तालुक्यातील 17, नगर तालुक्यातील पाच व पारनेर तालुक्यातील पाच अशा 27 गावांतील शेतक-यांच्या जमिनी संपादित होत आहेत.
या विस्तारीकरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. या पुर्वी लष्काराने सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र कवडीमोल भावाने संपादित केले होते. आताही 25 हजार हेक्टर क्षेत्र नव्याने संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे पारनेर, नगर आणि राहुरीतील 27 गावे तेथे राहाणारे नागरीक विस्थापित होणार आहेत. त्यामुळे नव्याने या भूसंपादनाला शेतक-यांसह ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत आहे. शेतकरी व या गावात राहाणा-या नागरीकांवर होणारा अन्याय दूर व्हावा, यासाठी आज लंके यांनी पवार यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. या वेळी वनकुटेचे सरपंच अॅड. राहुल झावरे, युवा नेते विजु औटी, निघोजचे सरपंच ठकाराम लंके ,सुनिल कोकरे उपस्थित होते.
स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही के. के. रेंज विस्तारी करणासाठी जमीन संपादनाचा घाट घालण्यात आलेला आहे. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्या अनुषंगाने आम्ही शरद पवार यांना साकडे घातले आहे. याबाबत संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संबंधितांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांच्याकडून आम्हाला देण्यात आली आहे. ही भेट पुढील आठवड्यात घेतली जाणार आहे, असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

