टाकळी ढोकेश्वर : के. के. रेंज जमिन अधिग्रहणबाबत बाधित गावांना दिलासा मिळणार आहे. जेष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची चर्चा फलदायी ठरली असून, या भागातील जमिनींचे भुसंपादन होणार नसल्याचे बैठकीत सिंग यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.
नवी दिल्ली येथे आज पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील गावांमधील महत्त्वाचा विषय ठरत असलेल्या के. के. रेंज जमिन अधिग्रहणबाबत शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत पवार यांनी सिंग यांना या भागातील भूसंपादन करण्यास विरोध केला व भूसंपादन झाल्यास या भागातील शेतकरी विस्थापित होतील, तसेच मुळा धरण, कृषी विद्यापीठ झाल्यामुळे लोकांचे पहिलेच विस्थापन झाले आहे. मुळा धरण असल्यामुळे हा भाग बागायती झालेला आहे. या भागातील प्रमुख पीक डाळिंब, ऊस यासंह गायी, शेळ्यामेंढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्थलांतर करणे शक्य नाही. याबाबी संरक्षण मंत्र्यांना निर्दशनास आणून दिले. या भागातील जमिन असल्याने बँक कर्ज नाकारतात यासंह अन्य बाबी निर्दशनास आणून दिल्या.
त्यावर सिंह यांनी यापुढे या बाबतीत कोणताही निर्णय घेत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, संरक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांमधे सर्व प्रथम बैठक होईल, तसेच बँक अधिकाऱ्यांची देखील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा बाबत बैठक लावू असे आश्वासन दिले.
पवार व लंके यांचा एकाच विमानातून प्रवास..
के. के. रेंज संदर्भात जेष्ठ नेते शरद पवार व संरक्षण मंत्री राजनाथ यांची बैठक पार पडल्यानंतर पवार व लंके मुंबई करीता एकाच विमानातून प्रवास करत मुंबईकडे रवाना झाले. ही.आमदार लंके यांच्यावर पवार यांचे विशेष प्रेम आहे व ही आम्हा कार्यकर्त्यांसाठी खूप अभिमानाची बाब असल्याचे सरपंच राहुल झावरे यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

