के. के. रेंजबाबत शेतकऱ्यांना दिलासा ! विखे, कर्डिले यांची संरक्षणमंत्र्यांशी बैठक - K. K. Meeting of Vikhe, Kardile, Zhaware with Defense Minister regarding range issue | Politics Marathi News - Sarkarnama

के. के. रेंजबाबत शेतकऱ्यांना दिलासा ! विखे, कर्डिले यांची संरक्षणमंत्र्यांशी बैठक

मुरलीधर कराळे
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुखांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती.

नगर : के. के. रेंज प्रश्नाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, राहुल शिंदे यांनी आज दिल्ली येथे भेट घेवून याप्रश्नाबाबत चर्चा केली.

याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुखांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. ही चर्चा सुमारे अर्धा तास सुरू होती.

नगर जिल्ह्यातील पारनेर- राहुरी- नगर तालुक्यातील २३ गावांतील ज्वलंत असलेल्या के. के. रेंजप्रश्नी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. के. के. रेंजच्या जमिनी संदर्भात राज्य सरकारने वेळेवर जी भूमिका घेतली पाहिजे होती ती न घेतल्याने संरक्षण विभागामार्फत संचालन सुरू केले. याबाबत या शिष्टमंडळाने २३ गावामध्ये सुरू झालेल्या संचालनाला स्थगिती मिळण्याबाबत मागणी केली. यावर संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या लष्कर प्रमुखांशी बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

के. के. रेंजबाबत राज्य सरकारची भूमिका देखील सकारात्मक असली पाहिजे. याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र राज्यसरकारने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने लष्कराने के. के. रेंज जमीन अधिग्रहण संदर्भात आपली कार्यवाही सुरू केली.

दरम्यान, या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तथापि, त्याला यश आले नव्हते. आता खासदार विखे पाटील, कर्डिले आदींनी लक्ष घातल्याने हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख