नगर : बहिणींना भेटण्यासाठी भाऊबिजेनिमित्त बहुतेक ठिकाणी बहिणी भावाकडे जात असल्या, तरी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आपल्या बहिणींना भेटण्यासाठी दरवर्षी नगर जिल्ह्यात येतात. हा त्यांचा खासगी दाैरा असला, तरी माध्यमांचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले नाही, तर नवलच.
जयंत पाटील यांची थोरली बहिण उषा तनपुरे या राहुरीतील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री आहेत. धाकटी बहिण निलिमा घुले या शेवगावचे माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी आहेत. तनपुरे व घुले ही दोन्हीही घराणी नगर जिल्ह्यातील मोठे प्रस्त आहेत. मोठ्या संस्था, कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. पाटील यांचा वरदहस्तही या घराण्यांवर कायम असणे स्वाभाविक आहे. मामांच्याच आशिर्वादाने प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपदाची संधी मिळाल्याचे सांगितले जाते.
आज जयंत पाटील नगरला आले. त्यांनी दोन्ही बहिणींची भेट घेतली. ओवाळणीचा कार्यक्रम झाल्यानंतर माध्यमांशी त्यांनी चर्चा केली. राज्य सरकारने विविध संकटांवर यशस्वी मात केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
मंदिर उघडण्याचे श्रेय भाजपला जाऊ शकत नाही
जयंत पाटील म्हणाले, की मंदिरे, प्रार्थनास्थळे खुले झाले असले, तरी भाविकांनी काळजी घेण्याची गरज आहे. परंतु त्याचे श्रेय भाजप घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते त्यांनी घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने मंदिरे बंद होती. राज्य सरकारने कोरोना काळात सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोना कमी होत असल्यामुळेच धार्मिक स्थळे खुले करता आले. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने योग्य वेळी घेतला आहे. त्याचे श्रेय महाविकास आघाडी सरकारला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना आहे. भाजपने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.
कोरोनावर यशस्वी नयोजन
सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात कोरोनाचा कहर होता. अनेक अडचणींना तोंड देत सरकार कोरोनावर यशस्वीपणे मात करीत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना कर्जमाफी, निसर्गाचा प्रकोप असलेले चक्रिवादळ, अतिवृष्टी अशा समस्यांना सरकारने यशस्वीपणे तोंड दिले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, सरकारने केलेल्या प्रयत्नाचा हा परिणाम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने हे शक्य झाले आहे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत असून, मुख्यमंत्री ठाकरे हेही समन्वय चांगला ठेवत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

