या दोन माजी आमदारांकडे अजूनही भरतो `जनता दरबार`

जिल्ह्यातील दोन आमदारांनी आपला जनता दरबार सुरूच ठेवला आहे. लोक येतात, कामे सांगतात. हे नेतेही आमदार असल्याप्रमाणेच अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न सोडवितात.
kardile and pichad.png
kardile and pichad.png

नगर : वर्षानुवर्षे आमदार म्हणून मिरविताना जनतेचे प्रश्न सोडविण्याची लोकप्रतिनिधींना सवय लागलेली असते. त्यातूनच `जनता दरबार` सारखी संकल्पना लोकप्रतिनीधींनीही राबविली. जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू. ते स्विकारून जय पचविण्याची सवय लागलेल्या नेत्यांनी पराजयही तितक्याच ताकदीने पचविला. विद्यमान आमदार नसले, तरीही जनतेची कामे करण्यासाठी कशाला पाहिजे लोकप्रतिनीधीचे पद. त्यामुळेच की काय जिल्ह्यातील दोन आमदारांनी आपला जनता दरबार सुरूच ठेवला आहे. लोक येतात, कामे सांगतात. हे नेतेही आमदार असल्याप्रमाणेच अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न सोडवितात.

हे दोन भाजप नेते म्हणजे अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव पिचड व राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले. या दोन्हीही नेत्यांच्या घरी अद्यापही जनता दरबार भरतो. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान नियमितपणे लोक आपले प्रश्न घेऊन येतात. हे नेते त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतात. संबंधित प्रश्नाची सोडवणूक जाग्यावरच होते. त्यामुळे लोकही खूष होतात. त्यानंतर त्यांचा दिनक्रम ठरतो. सकाळी दशक्रिया विधीला उपस्थिती नित्याचीच असते. रोज कोठे-ना कोठे दशक्रिया विधी असतेच. जुन्या संबंधामुळे ते जातात. उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण करतात.

शिवाजी कर्डिले गेले तब्बल 25 वर्षे आमदार होते. तेव्हापासून त्यांच्या बंगल्यावर लोकांची ये-जा सुरूच असते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी सरपंचपदापासून राजकारणात कारकिर्द गाजविली. तब्बल दोन तप त्यांनी विधानसभेचे सदस्यत्त्व मिळवून जनतेच्या मनात घर निर्माण केले. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभव झाला म्हणून खचून न जाता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. जनतेत जाणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, दशक्रिया विधी, लग्न सोहळ्यांना उपस्थिती यामुळे लोकांच्या मनावर त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. एखाद्या कार्यकर्त्याच्या लग्नाला जेव्हा आमदार येतात, तेव्हा त्याची काॅलर अधिक उंचावते. ग्रामीण भागात त्याला अधिक महत्त्व असते. हेच कर्डिले यांनी जाणून प्रत्येक ठिकाणी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे मतदारसंघातील जनतेच्या दृष्टीने तेच आमदार असल्यासारखे आहेत. एव्हढेच नव्हे, तर पठारावरील गावांमध्ये अजूनही कर्डिले यांनाच आमदार म्हटले जाते. काही गावांचा मतदारसंघ वेगळा आहे. श्रीगोंदे मतदारसंघात काही गावे गेल्याने मतदारसंघ वेगळा असला, तरी नगर तालुक्यातील अनेक गावे कर्डिले यांनाच आमदार मानतात. त्यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक करवून घेतात. सत्तेच्या प्रवाहात त्यांनी काही वेळा पक्षांतरही केले. परंतु लोकांचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी कायम प्राधान्य दिले.

वैभव पिचड यांनी पाच वर्षे विधानसभेत सदस्यत्त्व केले असले, तरी त्यांचे वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड अनेक वर्षे अकोले विधानसभा मतदारसंघाचे सदस्य होते. 1980 मध्ये आमदारकी त्यांच्या घरात आली. प्रारंभी काॅंग्रेस, नंतर राष्ट्रवादी व आता भाजपमध्ये राहून ते प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. तब्बल 40 वर्षे घरात आमदारकी असल्याने वैभव पिचड यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते. त्यामुळे ते युवकांमध्ये अप्रत्यक्षरित्या आमदार असल्यासारखेच होते. कारण युवकांचे सर्व प्रश्न सोडवित असत. मधुकरराव पिचड यांचा जनता दरबार पूर्वीपासूनच आहे. तोच कित्ता वैभव यांनीही गिरविला. आमदार असताना लोकांचे प्रश्न समजावून घेत ते सोडवणुकीसाठी अधिकाऱ्यांना फोन करणे सुरू होते. तीच पद्धत आजही सुरू होती. अकोले मतदारसंघात आमदार कोण, हे आदिवासी पट्ट्यात विचारले, तर ते वैभव पिचड यांचेच नाव घेतात. यावरूनच लोकांशी असलेली नाळ त्यांची अद्यापही किती जुळालेली आहे, हे त्याचे द्योतक ठरावे. 2019 च्या निवडणुकीत वैभव पिचड यांना पराभवाचा सामना करावा लागला, असला तरी तालुक्यातील लोकांच्या दृष्टीने तेच आमदार आहेत, हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com