पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यात सोमवारपासून जनता कर्फ्यू - Janata curfew in Shrigonda from Monday under the guidance of Pachpute | Politics Marathi News - Sarkarnama

पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यात सोमवारपासून जनता कर्फ्यू

संजय आ. काटे
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्‍यात आठवडाभर जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात बैठक झाली.

श्रीगोंदे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्‍यात आठवडाभर जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात बैठक झाली. तीत सोमवारपासून (ता. 14) सात दिवस (20 सप्टेंबरपर्यंत) अंमलबजावणीचा निर्णय झाला. दरम्यान, प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी या "कर्फ्यू'च्या निर्णयाशी प्रशासनाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांकडून नियमांचे योग्य पालन होत नसल्याने तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. येथील तहसील कार्यालयात आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली. आमदार पाचपुते, घनश्‍याम शेलार, बाबासाहेब भोस, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, व्यापारी संघटनेचे सतीश पोखर्णा उपस्थित होते.

बैठकीत 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. प्रभारी तहसीलदार पवार यांनी, जनता कर्फ्यूसाठी सर्व मदत करण्याचे मान्य करत प्रशासन सर्वांसोबत असल्याचे सांगितले. 

जनता कर्फ्यू काळात फक्त मेडिकल, हॉस्पिटल सुरू असतील. किराणासह सर्व दुकाने बंद राहतील. दूध तसेच पाणी वाटपासाठी सकाळी पाच ते सात व सायंकाळी पाच ते सातपर्यंत परवानगी असेल. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले, की कर्फ्यू कालावधीत कोणीही अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

हा निर्णय प्रसासनाचा नाही ः तहसीलदार

कोरोनाविषयी उपाययोजनांसाठी आमदार पाचपुते यांच्या सूचनेवरून बैठक घेतली. तीत सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाला. हा बंदचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही, असे प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी सांगितले.

हा बंद नेमका कुणाच्या सांगण्यावरून

हा बंद नेमका कुणाच्या सांगण्यावरून होत आहे, हा प्रश्न आहे. बंद करून तात्पुरता संसर्ग रोखता येईल. मात्र, बाजारपेठ खुली झाल्यानंतर संसर्ग दुपटीने वाढेल, हे वास्तव नाकारून चालणार नाही. जनता कर्फ्यूमध्ये सर्वसामान्यांचीच हेळसांड होते, असे मत आढळगावचे कापड व्यापारी शरद जमदाडे यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख