जामखेडचा चेहरा बदलणार ! मुख्याधिकाऱ्यांचा रोज सकाळी 6.30 वाजताच फेरफटका   - Jamkhed's face will change! Chiefs tour daily at 6.30 am | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

जामखेडचा चेहरा बदलणार ! मुख्याधिकाऱ्यांचा रोज सकाळी 6.30 वाजताच फेरफटका  

वसंत सानप
शुक्रवार, 17 जुलै 2020

पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वच्छतेला त्यांनी अधिक महत्त्व दिले असून, रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्याने निर्माण झालेले हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.

जामखेड : नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी पदभार स्विकारला आणि जामखेडचा चेहरामोहरा बदलण्याचा 'विडा'च त्यांनी उचलला आहे. दंडवते जामखेडला आठ दिवसांपूर्वी रुजू झाले. त्यांनी स्वतःच्या कामाचा ठसा निर्माण करणारे पाऊलं उचलायला सुरुवात केली आहेत. दररोज सकाळी साडेसहा वाजता संपूर्ण शहराचा फेरफटका दंडवते करतात.

पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वच्छतेला त्यांनी अधिक महत्त्व दिले असून, रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्याने निर्माण झालेले हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. ते ओळखून त्यांनी संबंधित ठिकाणी मुरूम टाकून दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. दंडवते यांनी सुरू केलेला हा उपक्रम जामखेडकरांना चांगलाच भावला आहे.

दंडवते सतरावे मुख्याधिकारी

जामखेड नगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिकेने आतापर्यंत सोळा मुख्याधिकारी झाले. दंडवते हे सतरावे मुख्याधिकारी आहेत. केवळ सहा वर्षाच्या काळात ऐवढी मुख्याधिकाऱ्यांची टीम पाहणारी जामखेड ही महाराष्ट्रातली ही पहिलीच नगरपालिका ठरली असावी. मात्र यामध्ये दंडवते यांनी केलेल्या कामाची सुरुवात पाहून त्यांचे वेगळेपण समोर आले आहे. मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्यानंतर  शहराची ओळख व्हायला काही महिने लागतात. मात्र त्यांनी केवळ काही तासाच जामखेडची स्वतःची नाळ जुळवून घेऊन कामाला सुरुवात केली आहे. 

मोठ्या महापालिकेत काम केल्याचा अनुभव पाठीशी

दंडवते यांनी यापूर्वी जळगाव महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून आपली कामगिरी चोख बजावली होती. तत्पूर्वी पिंपरी-चिंचवड, ठाणे या महानगरपालिकेमध्ये दंडवते यांनी काम केले आहे. त्यामुळे मोठ्या संस्थेमधून जामखेडसारख्या लहान कार्यक्षेत्र असलेल्या नगरपालिकेमध्ये त्यांनी आपल्या खांद्यावर सोपविलेली जबाबदारी अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. जामखेड हे कार्यक्षेत्र त्यांच्यासाठी लहान आहे. मात्र येथे चांगले काम करुन चेहरामोहरा बदलण्याची त्यांची मानसिकता आहे.

रहदारीची कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न 

जामखेड शहरातून चार जिल्ह्यात जाणारे रस्ते फुटतात. यामध्ये नगर, सोलापूर, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेकदा जामखेडकरांनी प्रयत्न केले आंदोलनही झाली, मात्र जामखेडची कोंडी काही फुटली नाही. तसे पाहता जामखेडला फार गरज आहे, बाह्यवळण रस्त्याची. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता केव्हा होईल, याबाबत संदिग्धता आहे. मात्र सध्या सुरू असलेले हे रस्ते प्रशस्त राहिला हवेत. याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लहान- मोठ्या  व्यावसायिकांधी काही नियम पाळावेत, स्वयंशिस्त पाळावी. आपल्या दुकान हायलाईट करण्यासाठी लावलेले फलक, दुकानांच्या दारात लावल्या जाणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या मध्येच उभी राहणारी वाहने ही सर्व रहदारीची कोंडी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहेत. यामध्ये सुधारणा व्हावी, ही काढली जावीत, तसेच रस्ते स्वच्छ असावेत, रस्त्यावर घाण साचू नये, याकरिता विशेष मोहीम दंडवते यांनी हाती घेतली आहे. 

सकाळी साडेसहाला रस्त्यावर

ते सकाळी लवकरच आपल्या कामाला सुरुवात करतात. कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन प्रभागनिहाय फिरुन त्या त्या भागातील्या अडचणी समजून घेत आहेत. त्या अडचणी सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त ठरतील, यावर त्यांचे काम सुरू आहे. आतापर्यंत मुख्याधिकारी म्हणून अनेकांनी जामखेड नगरपालिकेमध्ये पदभार सांभाळला, या सर्वांपेक्षाही वेगळा मुख्याधिकारी म्हणून स्वतःच्या कामाचा ठसा आणि ओळख दंडवते निर्माण करतील, याची झलक या निमित्तानं जामखेडकरांना पाहायला मिळाली आहे.

आता दर्जेदार सुविधांची जामखेडकरांना आशा

नगरपालिका झाल्यानंतर जामखेडच्या रहिवाशांना चांगल्या दर्जेदार सुविधा मिळतील, असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात त्या सुविधांपासून जामखेड कोर्स दूर राहिलेले आहे. ते अंतर कमी करण्यासाठी त्यांची भूमिका व त्यांच्या प्रशासनावरील पकड निश्चितपणे काम येईल आणि जामखेड एक वेगळी अशी स्थिती या निमित्ताने निर्माण झाली आहे.

जामखेडला उशीरा का होईना सक्षम मुख्याधिकारी म्हणून दंडवते लाभले आहेत. जामखेडला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार यांच्यासारखे राज्यात स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारा लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर जामखेडची ओळख राज्य पातळीवर पोहोचली. तशीच ओळख जामखेडचे मुख्याधिकारी दंडवते यांच्या माध्यमातून नगरपालिकेची राज्यात होईल, अशी अपेक्षा जामखेडकरांना आहे.

मोठ्या पालिकांतील कामाचा अनुभव येथे कामे येईल

यापूर्वी आपण मोठ्या पालिकांमध्ये काम केले आहे. त्या दृष्टीने जामखेड नगरपालिका अत्यंत लहान आहे. त्यामुळे चांगले काम करून शहराचा चेहरा बदलू. सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लवकरच चांगले निर्णय घेवू, असे मत मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख