जामखेड पूर्ववत ! दोन महिन्यानंतर बाजारपेठेत उगवला `सूर्य`

जामखेड चे व्यवहार सुरू होण्यासंदर्भात बुधवार (ता. 27) ला निर्णय झाला आणि गुरुवारी(ता. 28)जामखेडच्यारस्त्यांची 'कोंडी' फुटली. लॉकडाऊन आणि हॉटस्पॉटच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर साचलेली 'धूळ' गर्दीच्या एका झटक्यात दिसेनासी झाली
jamkhed
jamkhed

जामखेड : लाॅकडाऊन, व्हाटस्पाॅटच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून बंद राहिलेल्या जामखेड शहरातील सर्व व्यवहार पहिल्याच दिवशी सुरळीत सुरु झाले. वेळ होती सकाळी नऊ ते दुपारी तीनची; जसे यापूर्वी काही घडलेच नाही आणि आता कसली भिती अथवा धोका राहिलाच नाही, असे चित्र बाजारपेठेत दिसले.

सोशल डिस्टींगशनचा तर येथे फज्जाच उडाला. मात्र नागरिकांच्या या अशा वागण्याने पुन्हा आपल्यावर 'बे' चे पाडे म्हणण्याची वेळ येऊ नाही ना, अशी भिती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. 

तुंबलेली लग्नसराई, तुंबलेली मनं, पहिल्याच दिवशी ओसंडून वाहिली. यानिमित्ताने खरेदीसाठी अनेकांचे पाय दुकानांकडे आपसूकच ओढले गेले. कापड, सोन्याची बाजारपेठ, भांड्याची दुकान,किराणा दुकान, इलेक्ट्रीकल दुकान, टेलर्स सर्वत्र गर्दी होती. गेली दोन महिने शुकशुकाट असणारे रस्ते माणसांच्या गर्दीने न्हाऊन निघाले होते. दोन महिने स्वतःचे जगणे हरपलेले चौका चौकात डोळ्यात तेल घालून कसून चौकशी करणाऱ्या पोलिस दादांची गर्दी ओसरली होती.एक दोघे पोलिस होते, मात्र ते दररोज जेवढे 'अलर्ट' होते, त्याच्या एकदम उलट 'रिलॅक्स' झाल्याचे पहियला मिळाले. हे एकाच दिवसात जामखेडचे बदललेले रुप पाहून काही तरी चुकल्यासारखे झाले.

काळजी घेतली नाही, तर पुन्हा तेच

अचानक जामखेड शहरात झालेली गर्दी पाहून प्रशासनही हबकून गेले आहे. सोशल डिस्टनिंगचा बोजवारा, अनेकांच्या तोंडाला मास्क नाही या प्रकारामुळे प्रशासनाची चिंंता वाढली आहे. मागील दोन महिने प्रशासनाने आणि नागरिकांनी आपली विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी केलेला संघर्ष, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान, सारे काही व्यर्थ ठरू शकेल, अशी शक्यता ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.

जामखेड चे व्यवहार सुरू होण्यासंदर्भात बुधवार (ता. 27) ला निर्णय झाला आणि गुरुवारी (ता. 28) जामखेडच्या रस्त्यांची 'कोंडी'  फुटली. लॉकडाऊन आणि हॉटस्पॉटच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर साचलेली 'धूळ' गर्दीच्या एका झटक्यात दिसेनासी झाली.

हे सारे असे घडले

जामखेड शहर व संपूर्ण तालुका कडकडीत बंद होता. सर्व व्यवहार, दुकान बंद होते. नागरिक घराबाहेर पडत नव्हते. मात्र बुधवारी (ता. 27) जामखेड शहरातील व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना भेटले. व्यापारी आणि तहसीलदार यांच्यात बाजारपेठ पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा झाली. व्यापाऱ्यांनी जामखेडच्या शेजारील तालुक्यातील बाजारपेठ पूर्ववत सुरू झाल्या असून, जामखेड मात्र कडकडीत बंद आहे. येथील बाजारपेठ आणि व्यापार दोन्ही आडचणीत येईल, हे पटवून दिले.

मागील आठवड्यात प्रत्येक दुकान आठवड्यातून दोन दिवस कसे सुरू राहील, याचे नियोजन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले होते, मात्र त्या नियोजनामुळे व्यापारी समाधानी नव्हते. कोणत्याही ग्राहकाला दररोज वेगवेगळ्या वस्तु खरेदी करण्यासाठी रस्त्यावर यावे लागेल. सर्व दुकाने विशिष्ट वेळेसाठी सुरु राहिले, तर ग्राहकाकडून त्याला हवे असलेले सर्व काही एकाच दिवशी एकाच वेळी खरेदी करता येईल. यासाठी संपूर्ण बाजारपेठ सुरू व्हावी, असाच त्यांचा आग्रह राहिला. त्यानुसार सर्व नियमांचे काटेकोर पालन करून दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आणि जामखेड ची बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वात आधी जामखेडमध्ये जास्त कोरोनारुग्ण सापडले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा याची दखल घेत जामखेडकडे प्रशासनाला लत्र देण्याबाबत आदेश दिले. महाराष्ट्रात जामखेडचे नाव सर्वात पुढे घेतले जाऊ लागले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com