Jamkhed Panchayat Samiti: MLA Pawar and Pvt. Shinde's supporters are roped in | Sarkarnama

जामखेड पंचायत समिती : सभापतीपदासाठी आमदार पवार व प्रा. शिंदे यांचे समर्थकांत रस्सीखेच

वसंत सानप
शुक्रवार, 3 जुलै 2020

जामखेड पंचायत समितीच्या राजकारणात कधी नव्हे, ऐवढी चुरस निर्माण झाली असून, उत्कंठता शिगेला पोहचली आहे.

जामखेड : जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आजी-माजी उपसभापतींमध्ये ही लढत होणार असून, एक माजीमंत्री राम शिंदे समर्थक, तर दुसरे आमदार रोहित पवार समर्थक आहेत. त्यामुळे यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे व आमदार पवार यांच्यातच अप्रत्यक्षरित्या लढत होणार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या दोघांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत असून, नेमका सभापती पदाचा 'मान'  कोणत्या उपसभापतीला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जामखेड पंचायत समितीच्या राजकारणात कधी नव्हे, ऐवढी चुरस निर्माण झाली असून, उत्कंठता शिगेला पोहचली आहे.

पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती मनिषा सुरवसे व माजी उपसभापती राजश्री मोरे यांच्यात सभापतीपदासाठी सरळ लढत होत आहे. सुरवसे यांचे पती रवी सुरवसे हे माजी मंत्री राम शिंदे यांचे खंद्दे समर्थक आहेत, तर मोरे यांचे पती सूर्यकांत मोरे हे आमदार रोहित पवार यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात. इतर दोन सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. यापैकी डॉ. भगवान मुरूमकर भाजप सोबत, तर सुभाष आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मते आहेत. त्यामुळे येथील निवड आता चुरशीची बनली आहे.

जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रीया आज होत आहे; मात्र सभापतीच्या नावाची घोषणा उद्या होणार नाही, असे असले तरी पंचायत समितीचे सभापतीपद नेमके कोणात्या पक्षाला मिळते, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अशी सरळ लढत आहे. पक्षीय बलाबल पाहता सर्वच्या सर्व भाजपचे सदस्य निवडून आलेले असलेल्या या पंचायत समितीत दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळालेले आहेत. त्यामुळे येथील निवडणूक उत्कंठतावर्धक वळणावर जाऊन पोहचली आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात एकहाती असलेली ही संस्था आमदार रोहित पवार यांच्या दारी पोहचली आहे, मात्र येथील सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती जातात की काय  हे लवकरच स्पष्ट होईल.

जामखेड नगरपालिकेच्या  इतिहासात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राजकीय स्थित्यंतर होऊन माजीमंत्री राम शिंदे यांच्या हातून येथील सत्ता आमदार रोहित पवार यांच्याकडे पोहचली. त्यानंतर पंचायत समितीत नेमके आता काय होईल, याबाबत उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.

एकीकडे पंचायत समितीच्या सभापतीच्या आरक्षणावरुन जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाचा निर्णय औरंगाबाद खंडपीठात पोहचला असला, तरी दुसरीकडे समसमान सदस्य संख्या असल्याने आज होणाऱ्या निवड प्रक्रीयेत नेमका कोणाच्या नावाने कौल मिळतो? की समसमान मुद्यावर सभापती पदाची निवड 'चिठ्ठी' त जाऊन पोहचते की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

... तर चिठ्ठी दाखवून निवड प्रक्रीया

जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करताना जर दोन उमेदवार रिंगणात येऊन त्यांना समसमान मते मिळाले, तर सभापती निवडीसाठी चिठ्ठीचा मार्ग निवडला जाईल आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल, ती चिठ्ठी दाखवून निवड प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र सभापतीच्या नावाची घोषणा न्यायालयाच्या आदेशापर्यंत केली जाणार नाही, असे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख