आता ठरलं ! नगर जिल्हा विभाजनाचा लढा तीव्र करायचा - It's over now! Intensify the fight for the division of urban districts | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

आता ठरलं ! नगर जिल्हा विभाजनाचा लढा तीव्र करायचा

गाैरव साळुंके
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

कोरोनाची संकटकालीन परिस्थिती पुर्वपदावर येत असताना श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या चळवळीला नव्याने चालना देण्यासाठी आयोजित आॅनलाईन बैठक नुकतीच पार पडली.

श्रीरामपूर : नगर जिल्हा विभाजनाचे तुनतुने पुन्हा वाजू लागले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू असलेली चळवळ कोरोनामुळे थांबली होती. जिल्ह्याचे विभाजन करून उत्तरेत जिल्ह्याचे ठिकाण कोणते करायचे, यावरून गदारोळ सुरू होता. श्रीरामपूर, संगमनेर असा प्रश्न असताना आता ही चळवळ पुन्हा जोर धरू लागली आहे.

कोरोनाच्या संकटातही श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा लढा सुरुच असून, श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची जोरदार हाक थेट अमेरिकेतूनही नुकतीच देण्यात आली. तसेच आगामी प्रजासत्ताक दिनापासून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.

कोरोनाची संकटकालीन परिस्थिती पुर्वपदावर येत असताना श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या चळवळीला नव्याने चालना देण्यासाठी आयोजित आॅनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या वेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रताप भोसले यांनीे थेट अमेरिकेतून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध ठिकाणाहुन बैठकीत सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब औताडे, सुनंदा आदिक, सुरेश ताके, शरद डोळसे उपस्थित होते.

जिल्हा विभाजन, नवीन जिल्हा निर्मितीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झालेला आहे. त्याचा मंत्रालयीन पातळीवर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने पाठपुरावा करावा, अशी सूचना मिलिंद साळवे यांनी केली. समितीच्या माध्यमातुन प्रसारित होणाऱ्या राजकीय पोस्ट्सवर नाराजी व्यक्त करीत यापुढे अशा पोस्टस् टाळून सदस्यांनी समितीच्या मंचावर जिल्हा निर्मिती कार्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची अपेक्षा प्रताप भोसले यांनी व्यक्त केली.

लवकरच समितीची पुढील बैठक होणार असून, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या दृष्टीने काही ठोस सूचना समितीच्या विचाराधीन आणाव्यात, असे तिलक डुंगरवाल, शरद डोळसे यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचा श्रीरामपूर जिल्हा निर्मिती चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वाच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी डोळसे, ताके यांच्यावर सोपविली आहे. प्रजासत्ताक दिनापासून समितीचे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतल्याचे ताके यांनी सांगितले. उपस्थित सर्व सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. बैठकीत सुनंदा आदिक यांनी विविध सुचना केल्या. तर समन्वयक क्षितिज सुतालणे सूत्रसंचालन केले.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख