"It's easy to get married, but ..." Shiv Sena's Vijay Auti advised | Sarkarnama

``लग्न करणे सोपे पण...`` शिवसेनेच्या विजय औटींनी `यांना` दिला सल्ला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

जणू काही सगळे संपले, अशा अविर्भावात कोणी वावरण्याचे कारण नाही. पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष दिड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल.

टाकळी ढोकेश्वर : ``विद्यमान लोकप्रतिनिधीच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते,`` अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष विजय औटी यांनी नाव न घेता आमदार निलेश लंके यांना सल्ला दिला.

कोहकडी (ता. पारनेर) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त औटी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच सार्वजनीक कार्यक्रमास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मनातील भावना मोकळेपणाने मांडल्या. या वेळी काशिनाथ दाते, गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले, राहुल शिंदे, शंकर नगरे, नितीन शेळके, सरपंच डॉ.साहेबराव पानगे आदी उपस्थित होते.

पुढचे दिवस आपलेच

औटी म्हणाले, ``जणू काही सगळे संपले, अशा अविर्भावात कोणी वावरण्याचे कारण नाही. पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष दिड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. लोकप्रतिनिधींनी जनतेचे सेवक असल्यासारखे वागावे, तुम्ही मालक म्हणुन वागत आहात, हे चुकीचे आहे. सेवक असल्याची भावना जोपर्यंत तुमच्या मनात रूजनार नाही, तोपर्यंत तुमची वर्तणूक अशीच राहील.``

शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो

``राजकारणात हार-जीत होत असते. लोक खुप समंजस आहेत. अनेक लोक मला भेटत असतात. त्यांच्या समस्या सांगत असतात. आपल्यापुढे एकच प्रश्न आहे. त्या भावनांचे एकत्रित संकलन करणे व तालुक्याला पुन्हा योग्य दिशा देणे, भविष्यामध्ये ते काम आपण निश्चित करू. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो. तालुक्याचा विकास करायचा आहे,`` असे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य नाही 

निवडणुकीतील यश व अपयश हे तात्पुरते असते. निवडणूकीतील निकाल फिरतात. कधी बहुरंगी तर कधी दुरंगी लढती होतात. या निवडणुकीत पंकजा मुंडे, राम शिंदे या मंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे माझ्या मनामध्ये पराभवाचे अजिबात वैषम्य नसल्याचे विजय औटी यांनी सांगितले.

पद गेल्यावर माणसं विसरत असल्याची खंत व्यक्त करून औटी म्हणाले, की कोहकडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासाठी मी निधी दिला. काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी उद्घाटनासाठी मला बोलविले. मी केलेल्या कामांची त्यांनी जाण ठेवली. तालुक्यातील प्रत्येक गावाने मला प्रेम दिले आहे. आगामी काळातही देणार आहेत. कोहकडी गावाने माझ्या कामाचा गाैरव केला, यात समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख