कोपर्डीच्या घटनेला 4 वर्षे पूर्ण, निर्भयाच्या आई-वडिलांनी फोडला टाहो - It's been 4 years since Kopardi's death | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

कोपर्डीच्या घटनेला 4 वर्षे पूर्ण, निर्भयाच्या आई-वडिलांनी फोडला टाहो

निलेश दिवटे
मंगळवार, 14 जुलै 2020

कोपर्डीतील घटनेला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. तिच्या आई-वडिलांचा दिवस तिच्याच आठवणींनी उजाडतो. काल मात्र तिच्या आईने टाहो फोडला. तिच्या मारेकऱ्यांना फासावर लटकविल्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणा नाही, अशी भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

कर्जत : कोपर्डीतील घटनेला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. तिच्या आई-वडिलांचा दिवस तिच्याच आठवणींनी उजाडतो. काल मात्र तिच्या आईने टाहो फोडला. तिच्या मारेकऱ्यांना फासावर लटकविल्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणा नाही, अशी भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण राज्याला हेलावून सोडणारी घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. कोपर्डी (ता. कर्जत) येथे 13 जुलै 2016 रोजी है क्रौर्य घडले. एका मुलीवर सामुहिकपणे अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करण्यात आला. या घटनेने महाराष्ट्र हालला. दिल्लीतील सामुहिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील या घटनेने मोर्चे निघाले. मराठा मोर्चाने याबाबत विशेष आवाज उठविला. संपूर्ण जिल्हा एकवटला. अशा घटना जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी कठोर उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी झाली. अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, हीच सर्वसामान्यांची मागणी. मात्र, अजूनही तिच्या मारेकऱ्यांना फाशिची शिक्षा झालेली नाही. गुन्हाही सिद्ध झाला. त्यांना तुरुंगवास झाला. परंतु ते जिवंतच कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. नेमकी हीच खंत निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

तिच्या स्मृतिस्थळाजवळ नंदादीप

निर्भयाच्या घराजवळच घडलेल्या घटनेच्या ठिकाणीच तिचे स्मारक आहे. आजही निर्भयाचे आई-वडील तिच्या स्मृतिस्थळाजवळ शून्यात नजर लावून तासन्‌ तास बसतात. सकाळी- सायंकाळी दोन्ही वेळा तिच्या आठवणीने नंदादीप लावण्यात येतो. तसेच, रोज केलेल्या भाजी-भाकरीचा नैवेद्य तिला दाखविल्यावरच गळ्याखाली घास जातो, असे तिच्या आईचे हंबरून सांगणे स्थब्ध करते.

मोजक्याच ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली

दरवर्षी तेथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. ग्रामस्थ, नातेवाईक एकत्र येवून श्रद्धांजली अर्पण करतात. तिच्या आठवणीने पुन्हा सर्वजण शुन्यात जातात. चिड व्यक्त करून अशा प्रवृत्ती अजून कशा जिवंत आहेत, याबाबत द्वेश करतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमांचे पालन करीत, काल कुठलाही श्रद्धांजली अथवा सार्वजनिक कार्यक्रम ठेवला नव्हता. अत्यंत साधेपणाने, मोजक्‍या ग्रामस्थांच्या उपस्थितीत निर्भयाच्या स्मृतिस्थळाला पुष्प वाहण्यात आले.

तिच्या मारेकऱ्यांना व्हावी फाशी

"आमचा दिवस उगवतो तिच्याच आठवणीने नि मावळतोही तिच्याच विरहाने. चार वर्षे सरली; मात्र माझ्या काळजाच्या तुकड्याला न्याय मिळालेला नाही. तिचे मारेकरी फासावर लटकल्यावरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. असा गुन्हा करताना आरोपी शंभर वेळा विचार करतील..'' अशा शब्दांत कोपर्डी येथील निर्भयाचे आई-वडील आणि लहान बहिणीने भावना व्यक्त केल्या. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख