It is wrong to start a liquor store | Sarkarnama

दारूची दुकाने सुरू करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 मे 2020

केवळ नशाबाजांची हौस भागविण्यासाठी व महसूल गोळा करण्यासाठी दारूची दुकाने सुरू केली. म्हणजे सरकारची `विनाश काले विपरीत बुद्धी` आहे.

पारनेर : कोरोनाला रोखणे महत्त्वाचे असताना सरकारने दारूची दुकाने उघडणे कितपत योग्य आहे. लोकांना वाचवण्याचा विचार करणार की महसूल गोळा करण्याचा. अनेक कुटुंबे बेरोजगार झाले आहेत. त्यांची उपासमार होत आहे. केवळ नशाबाजांची हौस भागविण्यासाठी व महसूल गोळा करण्यासाठी दारूची दुकाने सुरू केली. म्हणजे सरकारची `विनाश काले विपरीत बुद्धी` असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही तीच अवस्था आहे. दिवसेंदिवस संसर्ग वाढत असून, त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आजार टाळण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे समाजिक आंतर पाळणे हा आहे. तरीही सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय अविचारी व आयोग्य आहे.
अधिकारी व सरकार जनतेला वारंवार सांगतात. कोरोनावर मात करण्यासाठी घरात रहा. सामाजिक अंतर पाळा. मास्क वापरा. त्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाऊन केले आहे. लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. आजाराचा फैलाव झाला, तर सर्वांना सुविधा पुरविणे देशाला शक्य होणार नाही. साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नंतरच्या उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणे, फायदेशीर आहे. म्हणून लॉकडाऊन हा योग्य पर्याय आहे. 
अधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांकडून तसे काम सुरू आहेत. डॉक्टर, परिचारिका, पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. दुर्दैवाने जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद  मिळत नाही. कोरोनाच्या संकटात ज्या गोष्टी युद्ध पातळीवर करणे गरजेच्या आहेत, त्यात संसर्ग रोखणे, रूग्णांना वाचवणे व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, या आहेत. दारू जिवनावश्यक नसताना केवळ सरकारला तीस हजार कोटीचा महसूल मिळतो. म्हणूनच दारू दुकाने सुरू केली, हे योग्य नाही. कारण मिळणाऱ्या महसुलापेक्षा कोरोनाचा धोका अधिक आहे. दारू दुकानांसमोर पहाटेपासून रांगा लागत आहेत.
आम्ही जनतेला कुठे घेऊन जात आहोत, असा प्रश्न निर्माण होतो. दारू दुकानासमोरील रांगा पाहता त्यांना ना कोरोनाची भिती, ना तळपत्या उन्हाची. अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. तोंडावर मास्क नाहीत. लॉकडाऊनमुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. आता दारूच्या दुकानासमोर पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. मी अनेक वर्षांपासून  दारुबंदीसाठी आग्रही आहे. अवैध दारू रोखण्यासाठी ‘ग्रामरक्षक दलाचा कायदा’ करण्यात आला आहे. गुन्हेगारीचे मूळ दारूमध्ये आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण  घटले आहे. दारूपासून मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडून बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी संपूर्ण दारुबंदीचा धाडसी निर्णय घेतला. हा आदर्श आमच्या राज्याने घेणे गरजेचे आहे, असेही हजारे यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख