मिटलं नव्हे वाढलं ! पारनेरच्या पक्षांतर नाट्याचा दुसरा अंक सुरू, विजय औटींची भांडाफोड - It didn't grow! The second act of Parner's transition drama begins, Vijay Auti's scandal | Politics Marathi News - Sarkarnama

मिटलं नव्हे वाढलं ! पारनेरच्या पक्षांतर नाट्याचा दुसरा अंक सुरू, विजय औटींची भांडाफोड

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 10 जुलै 2020

या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांची शिवसेनेतूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

पारनेर : पक्षांतराच्या नाट्यानंतर आता पारनेरमध्ये या नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. सर्व काही मिटलं, असे वातावरण तयार झाले असताना आता या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांची शिवसेनेतूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पक्षांतराच्या नाट्याला वेगळे वळण लागले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून हे नाट्य सुरू आहे. पाच नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. राज्यात दोन्ही पक्षाचे सरकार असताना हे पक्षांतर योग्य नव्हते. त्यामुळे याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. त्या नगरसेवकांची पुन्हा घरवापसी होत त्यांना शिवसेनेत पाठविण्यात आले. त्यामुळे सर्व काही मिटले, असे वाटत होते, मात्र या दरम्यान त्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पाच पानांचे निवेदन देवून त्याद्वारे औटी यांची भांडाफोड केली आहे. त्या निवेदनात केलेले गाैप्यस्फोट तालुक्याच्या राजकारणाला हादरा देणारे ठरले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून औटी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या निवेदनावर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उमा बोरुडे, नगरसेवक डाॅ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने आदींच्या सह्या आहेत. पाच पानांचे हे पत्र आज सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पारनेर तालुका पुन्हा ढवळून निघाला आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटीच्या वेळी हे पाचही नगरसेवक पूर्ण तयारीनिशी गेले होते. त्यांनी पाच पानांचे निवेदन तयार करून औटी यांच्याविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत. औटी यांना शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्षपद देवूनही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. विधानसभेत तब्बल साठ हजार मतांनी पराभव झाल्याने औटी हे सक्रीय राजकारणात राहण्याची शक्यता नाही. आता शिवसेनेच्या संघटनेचा उपयोग ते स्वतःच्या नातेवाईकांसाठी, अधिकाऱ्यांना दमबाजी करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी व निष्ठावान शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे पक्षाची धुरा द्यावी, अन्यथा शिवसेनेचे कार्यकर्तेही तालुक्यात शिल्लक राहणार नाहीत, असा थेट इशारा या निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे. 

ती दगडफेक औटी यांच्याच समर्थकांकडून

औटी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्या वेळी त्यांनी निलेश लंके यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. या कार्यक्रमात लंके यांना बसण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. कार्यक्रम संपल्यानंतर ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक ही औटी यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा गाैप्यस्फोट या निवेदनातून करण्यात आला आहे. त्यानंतर ती दगडफेक लंके यांच्या समर्थकांनी केल्याचे भासवून त्यांचे तालुकाध्यक्षपद काढून घेण्यात आले. असा आरोपही त्या पाच नगरसेवकांनी केला आहे.

याबरोबरच इतर अनेक आरोप करून औटी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख