औरंगाबादच्या नामांतराचा विषय अद्याप समन्वय समितीपुढे नाही - The issue of renaming Aurangabad is not yet before the Coordinating Committee | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादच्या नामांतराचा विषय अद्याप समन्वय समितीपुढे नाही

सतीश वैजापूरकर
शनिवार, 9 जानेवारी 2021

राज्यात अन्य सरकारी रुग्णालयात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आपण सांगितले आहे. चौकशीनंतर याप्रकरणाचा उलगडा होईल.

शिर्डी : शिवसेना अनेक वर्षांपासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करते. मात्र राज्य सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तो तिनही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीपूढे येते. नंतर तो विषय मंत्रीमंडळ बैठकीपुढे जातो. अद्याप हा विषय समन्वय समतीपुढे आलेला नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

भंडाऱ्यातील सरकारी रुग्णालयात दहा बालकांचा आगीत मृत्यू झाला. याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. राज्यात अन्य सरकारी रुग्णालयात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आपण सांगितले आहे. चौकशीनंतर याप्रकरणाचा उलगडा होईल. असे ते म्हणाले. 

साईसंस्थानमध्ये निम्मे विश्वस्त स्थानिक हवेत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन वर्ष लोटले, तरी साईसंस्थानवर विश्वस्त मंडळ नेमले नाही. मंडळाअभावी येथील विकास ठप्प झाला. हे देवस्थान राष्ट्रवादीने स्वतःकडे घ्यावे व नव्या मंडळात स्थानिकांची संख्या निम्मी ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी आज माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली. 

पटेल यांनी आज येथे येऊन साई समाधिचे दर्शन घेतले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत, गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदिप सोनावणे व विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके आदिंनी सहभाग घेतला. हा विषय समन्वय समितीपुढे आला, की तुमची बाजू त्यांच्यापुढे मांडू,असे आश्‍वासन पटेल यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले.

या वेळी पटेल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इच्छाशक्तीचा अभाव व राजकीय हस्तक्षेपामुळे शिर्डीचा विकास खुंटला. काही पाहण्यासारखे नसल्याने भाविक मुक्कामी थांबत नाहीत. लेसरशो सारख्या प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरी अभावी सरकारकडे पडून आहेत. त्यास मान्यता मिळावी. येथील स्थानिक समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक विश्‍वस्तांची संख्या किमान निम्मी असावी. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शैक्षणिक संकुल येथे सुरू करण्याबाबत पंधरा वर्षांपूर्वी पुढाकार घेतला. हा प्रकल्प मार्गी लावण्याची आता संधी आहे. शिर्डी विमानळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे व कार्गो सेवा सुरू करावी. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख