खासदार विखे पाटलांचा तो मुद्दा आमदार पवार यांनी खोडून काढला - That issue of MP Vikhe Patil was erased by MLA Rohat Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार विखे पाटलांचा तो मुद्दा आमदार पवार यांनी खोडून काढला

मुरलीधर कराळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नगर जिल्हा रुग्णआलयात आमदार पवार यांच्या हस्ते रेमडिसीवर औषधांचे 50 किट आणि सॅनिटायझर कॅन यांचे हस्तांतर झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले.

नगर : नगर जिल्ह्यात वाढते रुग्ण लक्षात घेता लाॅकडाऊन करायलाच हवे, हा मुद्दा यापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खोडून काढत लाॅकडाऊन होणार नसल्याचे सांगितले होते. आता आमदार रोहित पवार यांनीही हाच मुद्दा रेटून धरत संपूर्ण लाॅकडाऊन हा पर्याय नसून, अर्थकारण चालले पाहिजे, असे ठणकावून सांगितले. त्यामुळे भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांचा मुद्दा यांनीही खोडून काढला आहे. 

नगर जिल्हा रुग्णालयात आमदार पवार यांच्या हस्ते रेमडिसीवर औषधांचे 50 किट आणि सॅनिटायझर कॅन यांचे हस्तांतर झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत हे औषध राज्यात अनेक जिल्ह्यात देण्यात येत आहे.या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात सध्या रोज कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यात संपूर्ण लाॅकडाऊन हवे, अशी मागणी खासदार विखे पाटील यांनी केली होती. `आपण खासदार म्हणूनच नव्हे, तर एक डाॅक्टर म्हणून सांगतो आहोत, की लाॅकडाऊनची गरज आहे. परंतु जिल्हाधिकारी तसे करीत नाहीत,` असे त्यांनी सांगितले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण लाॅकडाऊन केले नाही. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला आल्यानंतर त्यांनीही संपूर्ण लाॅकडाऊन होणारच नाही, असा निर्वाळा देत कोरोनावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा रुग्णालयात काल आमदार पवार आल्यानंतर त्यांनीही पुन्हा तोच कित्ता गिरविला. लाॅकडाऊन हा कोरोनावर उपाय नसून, त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. सर्वसामान्य लोकांचे हाल होतात. त्यामुळे खासदार विखे पाटील यांचा मुद्दा खोडून काढत पवार यांनी संपूर्ण लाॅकडाऊनला एक प्रकारे विरोधच केला आहे.

जनतेसाठी मी बाहेर पडणारच

आमदार पवार म्हणाले, की कोणी काहीही म्हटले तरीही मी कर्जत-जामखेड मतदारसंघात जनतेच्या हितासाठी बाहेर पडणारच आहे. विकास कामांचे उद्घाटने, गावोगावी गाठीभेटी हे कार्यक्रम सुरूच असतील. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून हे कार्यक्रम सुरूच असतील, असे सांगून त्यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याला पवार यांनी उत्तर दिले.

महाआघाडी सरकार मजबूत

या वेळी बोलताना पवार म्हणाले, की भाजपला सत्तेची घाई झालेली आहे. दोन महिन्यात येणार, आठ महिन्यात येणार असे त्यांना पाच वर्ष म्हणत रहावे लागणार आहे. कारण महाआघाडी मजबूत आहे. विरोधी पक्षाची भूमिकाच विरोध करणे अशी असते. त्यामुळे ते महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही निर्णयावर विरोध करणारच. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू द्यावे.

तरीही शरद पवार बाहेर पडणारच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 ते 60 वर्षापुढील व्यक्तींनी बाहेर पडू नये. प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, असे आवाहन करून आमदार रोहित पवार यांनी शरद पवार मात्र जनतेच्या कल्याणासाठी बाहेर पडणारच आहेत, असे सांगतले. लोकांच्या हितासाठी ते स्वस्थ बसणार नाहीत, असे त्यांनी सांगतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख